‘शाहू’ पुरस्कारामुळे राष्ट्रहितासाठी दोन पावले पुढे टाकण्याची शक्ती :अण्णा हजारे

 

कोल्हापूर : देशातील आणि विदेशातील भरपूर पुरस्कार मिळाले. परंतु जेवढा आनंद ते पुरस्कार घेताना झाला नसेल त्यापेक्षा जास्त आनंद राजर्षी शाहूंच्या नावाचा पुरस्कार स्वीकारताना आज झाला. या पुरस्कारामुळे राष्ट्रहितासाठी, समाज हितासाठी 82 व्या वर्षातही दोन पावले पुढे टाकण्याची शक्ती मिळाली,अशा शब्दात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपली भावना व्यक्त केली.

राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्यावतीने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना राजर्षी शाहू पूरस्कार, श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. सन्मान चिन्ह,मानपत्र आणि एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे हे होते. महापौर सरीता मोरे, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिकेचे आयुक्त मल्लीनाथ कलशेट्टी, डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. अशोक चौसाळकर, ट्रस्टच्या सचिव डॉ. राणी ताटे आदी यावेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी महसूल, सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पाठविलेल्या संदेशाचे वाचन सूत्रसंचालक पंडित कंदले यांनी केले.
सत्काराला उत्तर देताना अण्णा हजारे पुढे म्हणाले, हा पुरस्कार राजर्षी शाहूंच्या नावाचा, संस्था आणि देणारे हात स्वच्छ आहेत म्हणून मी हा पुरस्कार स्वीकारला. समाजातील जातीय विषमता दूर करण्यासाठी राजर्षी शाहूंनी आपले आयुष्य घालवलं. त्यांच्या विचारांवर, त्यांच्या पावलांवर पाऊल टाकून आपण थोडातरी प्रयत्न केला पाहिजे. महाराजांचा आदर्श घेऊन जातीपातीच्या भिंती मोडण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. आयुष्यात अपमान पचवायला शिकलं पाहिजे. चारित्र्य, आचार, विचार शुध्द हवेत. जीवन निष्कलंक हवे. गावासाठी, आपल्या देशासाठी, समाजासाठी काही करायचंय ही भावना म्हणजे तरुणपण आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन करुन पुरस्काराची मिळालेली एक लाख रुपयांची रक्कम स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधीकडे सुपूर्द करत असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.
गांधीवादी विचारवंत अण्णांचा सन्मान करण्याचा मान सर्वात मोठा आहे, असे सांगून श्रीमंत शाहू छत्रपती पुढे म्हणाले, उपोषण आणि सत्याग्रह करुन सर्वसामान्य जनता केंद्रबिंदू मानून अण्णांनी जनहिताचे काम साध्य केले आहे. लोकपाल नियुक्तीमध्ये अण्णांचा सिंहाचा वाटा आहे. राजर्षी शाहूंच्या कार्याच्या विचारांवर अण्णांनी ग्रामीण भागाची प्रगती कशी करायची, हे जगाला दाखवून दिले आहे.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरु डॉ. शिंदे म्हणाले, राजानं राज्यासाठी काय करावं असा मानदंड दाखवून देणारा ऋषितुल्य राजा, समतेचे पुनर्लेखन करणारा राजा म्हणजेच राजर्षी शाहू महाराज ! याच राजाच्या विचारावर अण्णांनी अतुलनीय योगदान समाजासाठी दिले आहे. श्रेष्ठ समाज सुधारकाच्या नावाचा पुरस्कार जेष्ठ समाजसेवकाला दिला जातो हे पुरस्काराचे मोल वाढवणारे आहे. राजर्षींच्या शिक्षणाचा वसा स्वीकारुन अण्णांनी लोकशिक्षणाचं स्वरुप दिलं. राजर्षी शाहू, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर आणि महात्मा गांधी या चौघांच्या विचारांच्या खांद्यावरुन अण्णांनी परिवर्तनाची पालखी पुढे नेली, असेही ते शेवटी म्हणाले.
जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सुरुवातीला सर्वांचे स्वागत करुन प्रास्ताविक केले. डॉ. अशोक चौसाळकर यांनी गौरवमूर्तीचा परिचय करुन दिला. राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या सचिव डॉ. राणी ताटे यांनी मानपत्राचे वाचन केले. ट्रस्टचे प्रशासन अधिकारी राजदिप सुर्वे यांनी सर्वांचे आभार मानले. राष्ट्रगीतांनी कार्यक्रमाची सांगता केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!