
कोल्हापूर: थायलंड सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या वतीने २३ व २४ जून रोजी बँकॉक येथे पाच देशातील मान्यवर अधिकारी तज्ञ यांच्या वाणिज्य विषयक परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेमध्ये पाच देशातील उद्योगपती, व्यापारी, राजकारणी, अर्थतज्ञ, कायदे सल्लागार, वाणिज्य सल्लागार, सरकारी अधिकारी सहभागी झाले होते. या परिषदेस थायलंड सरकारच्या निमंत्रणावरून थायलंड देशाचे वाणिज्य सल्लागार म्हणून अर्थतज्ञ चेतन अरुण नरके यांना सहभागी होण्याची संधी मिळाली.
कंबोडिया, लावस, मॅनमार्क, व्हीएतनाम आणि थायलंड अशा पाच देशांनी एकत्र येऊन परस्पर समन्वयातून व्यापारवृद्धी विषयक रणनीती तसेच धोरण निश्चित करण्याच्या अनुषंगाने ही परिषद आयोजित केली होती. याबाबत अर्थतज्ञ चेतन नरके यांनी आज कोल्हापुरात सविस्तर माहिती देण्यासाठी पत्रकारांशी संवाद साधला. सध्या अमेरिका आणि चायना या दोन देशात व्यापार युद्ध सुरू आहे. त्यामुळे चायनाला आपल्या उत्पादनांची अमेरिकेत विक्री करणे अवघड झाले आहे. दोन देशातील व्यापार युद्धाचा आपल्या देशांना कशाप्रकारे लाभ उठवता येईल यावर सांगोपांग चर्चा करणे हा या परिषदेचा हेतू होता.
भारत सरकारने आपली अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन अमेरिकन डॉलरपर्यंत वाढविण्याचा निर्धार केला आहे. भारताची लोकसंख्या आणि स्थिर सरकार या सकारात्मक गोष्टींचा विचार करता भारताबरोबर सुद्धा व्यापार संबंध वाढवण्याकरता काम करता येईल. याबद्दलही या परिषदेमध्ये चर्चा झाली. दोन दिवसाच्या या परिषदेमध्ये अनेक मान्यवरांनी देशांतर्गत वाहतूक व्यवस्था, व्यापाराला चालना देण्यासाठी कराची सूची, कंपन्यांचे रजिस्ट्रेशन सुलभ आणि सुटसुटीत कसे करता येईल, चित्रपट, शेती पायाभूत सुविधा, दळणवळण अनिमेशन, ऑटोमोबाईल शिक्षण, आंतरराष्ट्रीय जर्नालिझम, डायमंड व गोल्ड ज्वेलरी, दुग्धजन्य पदार्थ आदी क्षेत्रातील उत्पादन बाबत काय करता येईल यावर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली.
अर्थतज्ञ चेतन नरके यांना या पाच देशांच्या प्रतिनिधींना मार्गदर्शन करण्याची ही संधी मिळाली. भारताचा नागरिक आणि थायलंडचा वाणिज्य सल्लागार या नात्याने मार्गदर्शन करताना भारतातील उत्पादने आणि त्यांची पाच देशांना असलेली उपयुक्तता यात गोष्टींवर मी लक्ष केंद्रित केले असून भारतात निर्माण होणारी आयुर्वेदिक औषधे, कुशल कारागीर, ऑटोमोबाईल मधील उत्पादने, शेती यामधील हळद, डाळिंब, आंबा, द्राक्षे यासह अन्य प्रक्रिया उद्योग संबंधांची माहिती मी परिषदेत विस्ताराने मांडली या उत्पादनांची देवाण-घेवाण कशी होऊ शकते हे देखील पटवून दिले आहे असेही अर्थतज्ञ चेतन नरके यांनी सांगितले. या परिषदेमुळे पाच देशांची अर्थव्यवस्था सक्षम आणि मजबूत होण्यास तसेच व्यापारवृद्धी उत्पादन क्षमता वाढवण्यास मदत होणार आहे. सामंजस्यातून केल्या जाणाऱ्या व्यवसायामुळे सहयोगसुद्धा वाढणार आहे. या देशांचे व्यापार विषयक कार्यक्षेत्रे विस्तारण्यास मदत होणार आहे असेही नरके यांनी सांगितले.
Leave a Reply