राज्य महिला आयोगाच्या वारी नारीशक्तीची उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

 
पुणे : वारीमध्ये महिलांचा लक्षणीय सहभाग लक्षात घेता महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने यावर्षी वारी नारीशक्तीची उपक्रम राबवण्याचे ठरवले. या उपक्रमाचे उदघाटन पुण्यातील शनिवारवाडा परिसरात झाल्यानंतर पालखी सोहळ्यामध्ये चित्ररथ आणि महिला सक्षमीकरणाची दिंडी सामील झाली. या कार्यक्रमांतर्गत यावर्षी महिला सक्षमीकरणाचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाअंतर्गत वारीमध्ये महिला जागृतीकरणासंबंधी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या सर्व कार्यक्रमांना वारीतील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
महाराष्ट्रभरातील महिला दरवर्षी वारीमध्ये सहभागी होत असतात ज्यामध्ये ग्रामीण भागातील महिलांचे प्रमाण जास्त असते. वारी नारीशक्तीची उपक्रमातर्फे या महिलांना सॅनिटरी पॅड आणि मासिक पाळीदरम्यानची स्वच्छता याविषयी माहिती देण्यात आली. यावेळी असे आढळून आले की बर्‍याच महिलांना याविषयी माहिती नव्हती. ही माहिती पहिल्यांदा त्यांच्यापर्यंत पोहोचली. सासवड जवळील पवारवाडी परिसरात दिंडी क्रमांक 43 मधील महिलांना चित्ररथामध्ये मी सिंधुताई सपकाळ हा चित्रपट दाखवण्यात आला. 2000 पेक्षा जास्त महिलांनी हा चित्रपट पाहिला. यावेळी उपस्थित महिलांमध्ये पॅड्सचे वितरण करण्यात आले असून त्यांचे प्रबोधन करण्यात आले.आयोगातर्फे या उपक्रमाअंतर्गत दोन्ही मार्गांवर प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी 3000 सॅनिटरी पॅडस वितरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. या दिंडीमध्ये दोन्ही मार्गांवर चांगला प्रतिसाद या उपक्रमाला मिळत असल्याची माहिती आयोगाचे प्रकल्प अधिकारी प्रणव पवार ह्यांनी दिली.
माऊलींच्या मार्गावरील वाल्हे मुक्कामी वारीतील सहभागी सांगलीतील काही वारकरी महिलांनी या उपक्रमाला भेट दिली. त्यांना घरगुती हिंसेविषयी कायदे आणि अशी हिंसा एखाद्या महिलेसंदर्भात घडत असेल  तर तिने कुठे दाद मागावी याविषयी माहिती देण्यात आली. यासंदर्भात महिला आयोगाची मदत मिळविण्याची प्रक्रिया, आयोगाशी संपर्क साधण्याचे मार्ग सांगण्यात आले. हे कायदे बर्‍याच महिलांना ठाऊक नव्हते. त्यामुळे अर्थातच तक्रार कुठे दाखल करावी याबद्दल माहिती नसल्यामुळे महिला काही करू शकत नाहीत. यावेळी उपक्रमातील सहभागी महिला आयोगाच्या कर्मचार्‍यांनी ड्युटीवर तैनात असणार्‍या महिला कॉन्स्टेबल्सना माहिती पुस्तिका देऊन त्यांना सुद्धा महिला सुरक्षेविषयी कायद्यांची माहिती देण्यात आली.
जेजुरी परिसरात निशंक आर्टस् अँड एज्युकेशन या संस्थेच्या शिक्षक वर्गाला महिला सुरक्षेसंबंधी कायदे, महिलांना मिळणारी आर्थिक मदत याविषयी सरकारी पातळीवर उपलब्ध योजना याविषयी माहितीचा समावेश असणारी महिला आयोगाची माहिती पुस्तिका देण्यात आली,  तसेच एखाद्या प्रसंगी महिला आयोग त्यांच्या कामात कसा येऊ शकतो. महिला आयोगाची मदत कशी मिळवायची यासंबंधी माहिती देण्यात आली. महिला शिक्षिकांनी यावेळी आपल्या अनेक शंकांचे निरसन करून घेतले.
महिला कीर्तनकार,पोवाडाकार आणि भारूडकार यांचेही ठिकठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले. ज्यामध्ये  महिला सक्षमीकरणाचा संदेश देणार्‍या विषयांचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये महिला कलाकारांनी आपल्या कलेचे सादरीकरण करून महिला वारकर्‍यांकडून कौतुकाची दाद मिळवली. आणि कलाकारांना सुद्धा या महिला वारकर्‍यांचे प्रबोधन कीर्तन, पोवाडा आणि भारुडाच्या माध्यमातून करण्यात  आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!