सौर ऊर्जेद्वारे 2 ते 3 वर्षात शेतकऱ्यांना वीज: पालकमंत्री चंद्रकांत पाटील

 

कोल्हापूर : राज्यातील शेतकऱ्यांना लागणारी वीज येत्या दोन-तीन वर्षात सौरउर्जा प्रकल्पाद्वारे उपलब्ध करुन देण्याचा मानस आहे. यासाठी राज्यात सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पावर शासनाने अधिक भर दिला असल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
महावितरण आणि ईईएसएलच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री सौर ऊर्जा वाहिनी योजनेचा उदघाटन आणि लोकार्पण सोहळा गडहिंग्लज येथे आज करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास नगराध्यक्ष स्वाती कोरी आमदार हसन मुश्रीफ, आमदार संध्यादेवी कुपेकर, म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, गोकुळचे संचालक बाबा देसाई, विद्युत वितरण कंपनीचे मुख्य अभियंता अनिल भोसले, ईईएसएलचे अतिरिक्त महासंचालक अनिल दाभाडे आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना स्वस्त वीज देण्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्प उपयुक्त असल्याचे स्पष्ट करुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, सौर ऊर्जा प्रकल्पामुळे कमी खर्चात वीज निर्मिती होण्याबरोबरच पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्याचेही महत्वपूर्ण काम होत आहे. राज्यातील शेतकऱ्यांना 22 हजार मेगावॅट वीज लागणार असून ही वीज सौरऊर्जा प्रकल्पाद्वारे येत्या दोन-तीन वर्षात उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न आहे. येत्या डिसेंबर अखेर 200 मेगावॅट वीज सौरऊर्जा प्रकल्पाद्वारे उपलब्ध करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.
औद्योगिक घटकांनाही कमी दरात वीज उपलबध करुन देण्याच्या दृष्टीने गोकुळ शिरगाव येथे मोठा सौरऊर्जा प्रकल्प राबविण्यात येत असल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले, जलविद्युत निर्मितीला मर्यादा असून, त्याचा खर्चही मोठा आहे त्यामुळे सौरऊर्जा प्रकल्पाच्या निर्मिती मध्ये उद्योजकांनीही सहभागी होणे गरजेचे आहे. सौरऊर्जा निर्मितीचे छोटे- छोटे प्रकल्प हाती घेणे गरजेचे असून सौरउर्जा प्रकल्पाच्या निर्मितीमुळे देशातील शेती आणि उद्योगाचे अर्थकारणही बदलेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री सौर ऊर्जा वाहिनी योजनेअंतर्गत राज्यात सौरऊर्जेचे प्रकल्प हाती घेत असून, कोल्हापुरात गडहिंग्लज, हलकर्णी, शिनोनी या तीन केंद्रामधून 2.42 मेगावॅट क्षमतेची वीज निर्मिती करुन त्याद्वारे परिसरातील 5 हजार शेतकऱ्यांना दिवसा ही वीज उपलब्ध करुन दिली जाणार आहे.याप्रसंगी आमदार हसन मुश्रीफ, आमदार श्रीमती कुपेकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
समारंभास माजी राज्यमंत्री भरमू अण्णा पाटील, माजी आमदार श्रीपतराव शिंदे, विद्युत‍ वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता सागर म्हारुळकर, कार्यकारी अभियंता सुरेंद्रनाथ भोये, ईईएसएल कंपनीचे संचालक व्यंकटेश व्दिवेदी, प्रादेशिक व्यवस्थापक दिपक कोकाटे, प्रातांधिकारी विजया पांगारकर, तहसिलदार रामलिंग चव्हाण यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी, नागरिक आणि शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!