
कोल्हापूर : आयडीबीआय बँक लिमिटेडने द न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेडसोबत बँकअश्युरन्स कॉर्पोरेट एजन्सी करार केला आहे. यामुळे आता आयडीबीआय बँकेच्या 1850 पेक्षा जास्त शाखांच्या 20 मिलियन ग्राहकांना न्यू इंडियाच्या सर्वसाधारण विमा उत्पादनांचा लाभ घेता येईल. न्यू इंडियाच्या विमा योजना विविध प्रकारच्या जोखमींपासून आर्थिक संरक्षण मिळवून देण्याच्या दृष्टीने खास तयार करण्यात आल्या आहेत. याभागीदारीबद्दल बोलताना आयडीबीआय बँक लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी राकेश शर्मा म्हणाले की, “आमच्या ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्याच्या उद्देशाने द न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड या भारतातील सर्वात मोठ्या आणि देशात तसेच जागतिक पातळीवर मजबूत स्थान असलेल्या नॉन-लाईफ इन्श्युरन्स कंपनीसोबत भागीदारी करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. सर्वसाधारण विमा क्षेत्रात या कंपनीचा बाजारपेठेतील हिस्सा 15% असून किंमत आणि सेवा या दोन्ही बाबतीत आयडीबीआय बँकेच्या ग्राहकांना उत्तम सेवा देण्यात ही कंपनी मोलाची भूमिका बजावेल. सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या अशा विमा कंपनीची विश्वसनीयता आणि कार्यक्षम कॉर्पोरेट प्रशासन यामुळे आयडीबीआय बँकेच्या ग्राहकांना अनेक विविध सर्वोत्कृष्ट उत्पादनांचा लाभ घेता येईल तसेच फीच्या माध्यमातून बँकेच्या महसुलात लक्षणीय भर पडेल.” द न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेडचे सीएमडी अतुल सहाय यांनी सांगितले, “भारतातील सर्वात जुन्या आणि सर्वात मोठ्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यांपर्यंत पसरलेल्या विशाल नेट्वर्कमार्फत बँकिंग सेवा प्रदान करत असलेल्या कमर्शियल बँकांपैकी एक आयडीबीआय बँकेसोबत भागीदारी करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. उत्पादनाच्या किमती बरोबरीनेच ग्राहकांचे लहान मोठे सर्व दावे तातडीने निकाली काढण्यावर आम्ही विशेष भर देतो. आम्ही असे मानतो की, या दोन्ही कंपन्यांचे संपूर्ण भारतात पसरलेल्या विशाल नेटवर्कचा लाभ घेत, माहिती तंत्रज्ञानामार्फत ग्राहकसेवांना प्राधान्य देण्यासाठी दोन्ही संस्थांच्या क्षमतांचा पुरेपूर उपयोग करून घेता येईल.” करारावरस्वाक्षऱ्या केल्या जाण्याच्या दिवशी “सुरक्षा कवच” ही खास तयार करण्यात आलेली वैयक्तिक अपघात विमा पॉलिसी सुरु करण्यात आली. व्यक्ती तसेच व्यवसायांच्या विविध गरजा भागवण्यासाठी सक्षम असलेल्या इतर उत्पादनांच्या बरोबरीनेच ही पॉलिसी देखील लवकरच उपलब्ध होईल. ग्रामीण व निम-शहरी भागांमध्ये आयडीबीआय बँकेने आपले मजबूत स्थान प्रस्थापित केले आहे. आता या भागीदारीमुळे बँकेच्या सर्व ग्राहकांना न्यू इंडियाच्या विविध जोखीमांना समजून त्यानुसार तयार केलेल्या विविध संरक्षक कव्हर्सचा लाभ घेता येईल.न्यू इंडियाचे विशाल वितरण नेटवर्क, तत्पर सेवा व दावे निकाली काढण्याचा अतिशय उत्तम रेकॉर्ड यांचेही लाभ बँकेच्या ग्राहकांना मिळतील.या भागीदारीमुळे न्यू इंडियाला आपली नाविन्यपूर्ण उत्पादने जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचवता येतील आणि जास्तीत जास्त ग्राहकांना कधीही, कोठूनही त्यांच्या जोखीम संरक्षण सेवांचा लाभ घेता येईल.
Leave a Reply