कोविड-19 लसीकरण ड्रायरणचे पंचगंगा हॉस्पीटल येथे प्रात्यक्षिक
कोल्हापूर: राज्यामध्ये तसेच कोल्हापूर शहरामध्ये कोविड-19 लसीकरण मोहिम राबविणेत येणार असून त्याकरीता आरोग्य कर्मचायांची नोंदणी पूर्ण झालेली आहे. याच लसीकरण मोहिमेचा भाग म्हणून शासनाचे निर्देशानुसार कोल्हापूर महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत कोविड-19 लसीकरणाचे प्रात्यक्षिक पंचगंगा हॉस्पीटल येथे आज घेण्यात आले.सदरची मोहिम नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्र.4 पंचगंगा येथे प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली.या ड्रायरण प्रात्यक्षिकाचे आरोग्याधिकारी डॉ.अशोक पोळ, आरसीएच नोडल ऑफिसर डॉ.आमोलकुमार माने, लसीकरण अधिकारी डॉ.रुपाली यादव, वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश औंधकर, पंचगंगा रुग्णालय व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व अधिकारीकर्मचारी यांनी नियोजन केले. सदरचा ड्रायरण सकाळी 9 वाजता सुरु करण्यात आला. यासाठी 25 आरोग्य कर्मचारी यांची नोंदणी संगणकीकृत करणेत आली होती. त्याप्रमाणे 25 कर्मचारी यांचे कोविड-19 लसीकरणाचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. सदर ड्राय रण मध्ये प्रतिक्षा कक्ष, लसीकरण कक्ष व निरिक्षण कक्ष स्थापन करण्यात आला होता. या कक्षामध्ये एकूण 5 कर्मचा-यांची नेमणूक करण्यात येऊन त्यांना नेमूण दिलेल्या कामाप्रमाणे लाभार्थींच्या नोंदणीची खात्री करुन ओळखपत्र पुरावा कोविड-19 पोर्टलवर तपासून त्यांचे लसीकरण प्रात्यक्षिक करण्यात आले. लसीकरण प्रात्यक्षिकवेळी शासन मार्गदर्शक सुचनेनुसार सर्व बाबींचा अवलंब करण्यात आला. लसीकरणानंतर लाभार्थीला 30 मिनिटे निरिक्षण कक्षामध्ये थांबवण्यात येऊन सदर लाभार्थीला कोविड-19 बाबत आरोग्य शिक्षण देणेत येऊन प्रात्यक्षिक पार पाडण्यात आले. सदर ड्रायरण वेळी इतर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी भेट देऊन कोविड-19 लसीकरणाचे प्रात्यक्षिकाची माहिती घेतली.