शास्त्रीय गायकी ही स्वरप्रधान: पं. नाथराव नेरळकर

 

IMG_20160120_232126कोल्हापूर : शास्त्रीय गायनकला ही शब्दप्रधान नव्हे, तर स्वरप्रधान आहे. त्या दृष्टीनेच तिचा आस्वाद घेता आला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ संगीतज्ज्ञ पद्मश्री पंडित नाथराव नेरळकर यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागात आजपासून सुरू झालेल्या संगीत- नाटक महोत्सवाचे उद्घाटक या नात्याने ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.

पं. नेरळकर यांनी आपल्या व्याख्यानाला सांगितिक जोड देऊन जणू दोन तासाची मैफिलच रंगवली. ते म्हणाले, संगीत हे आत्मसमाधानासाठी आहे, असे म्हटले जात असले तरी, ते खऱ्या अर्थाने लोकांसाठी, समाजासाठीच आहे, याची जाणीव संगीताच्या साधकांनी ठेवायला हवी. या क्षेत्रात महान कामगिरी बजावणाऱ्या थोर व्यक्तीमत्त्वांचा आपल्या गायकीवर प्रभाव पडतो, हे खरे आहे. तथापि, त्यांच्या आवाजाच्या नकलेतून बाहेर पडून स्वतःची स्वतंत्र गायनशैली शोधावी, निर्माण करावी. त्यासाठी अखंड साधना व रियाझाला पर्याय नाही. एखादी मैफिल करताना आजही मनावर मोठे दडपण येते, गुरूंचा धाक वाटतो. पण, असे वाटणे हे आपले विद्यार्थीपण कायम असल्याची साक्ष देते. मी आजही संगीताचा विद्यार्थी आहे. गाणे आजही शिकतो आणि शिकवण्याचीही हौस मला आहे. दुसऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे गाणे मन लावून ऐकतो आणि मला ते आवडते. व्यक्तीशः कोणत्याही घराण्याचे मला वावडे नाही. सर्वांची गायकी मला त्यांच्या वैशिष्ट्यांसह आवडते.

कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, कोल्हापूरला कलापूर म्हटले जावे, इतके कला, साहित्य, सांस्कृतिक, क्रीडा आदी सर्वंच क्षेत्रांना दिग्गजांची मांदियाळीच या भूमीने दिली. येथील कला संस्कृतीचा कॅनव्हास खूपच मोठा आहे. येथील कलाविश्व बहरण्यास राजर्षी शाहू महाराज यांचा राजाश्रय कारणीभूत होताच, पण त्याखेरीज इतर कारणांबाबतही मूलभूत व पूरक अशा दोन्ही स्वरुपाचे संशोधन व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सुरवातीला पं. नेरळकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी विभाग प्रमुख व  ज्येष्ठ गायिका भारती वैशंपायन उपस्थित होत्या. अधिविभाग प्रमुख डॉ. एन.व्ही. चिटणीस यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. निखील भगत यांनी आभार मानले. या सत्रानंतर प्रसिद्ध चित्रकार बबन माने यांच्या चित्र प्रदर्शनाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!