
कोल्हापूर : भारत सरकारकडून सुमारे 30 लाख रुपयांचे CBNATT मशिन सीपीआरच्या क्षयरोग केंद्रास मिळाले असून या मशिनचा लोकार्पण सोहळा जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या हस्ते 22 मार्च रोजी क्षयरोग केंद्रात होणार असल्याचे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक यांनी सांगितले.
24 मार्च या जागतिक क्षयरोग दिनानिमित्त माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत डॉ. हर्षला वेदक यांनी माहिती दिली. यावेळी राजर्षि शाहू छत्रपती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या क्षयरोग विभाग प्रमुख डॉ. अनिता सैबन्नावर, वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपाली भाट, डॉ. बांदिवडेकर आदि उपस्थित होते.
डॉ. हर्षला वेदक म्हणाल्या, ज्यावेळी क्षयरुग्ण नेहमीच्या औषधोपचाराला दाद देत नाही अशा रुग्णांच्या थुंकीचे नमुने पुण्यास पाठविण्यात येत होते. त्याचा अहवाल 10 ते 15 दिवसांनी मिळत असे आता CBNATT मशिनमुळे कोल्हापूरातच केवळ 2 तासात निदान होईल. या मशिनमुळे प्राधान्याने लहान मुले, एचआयव्ही बाधीतांचे निदान होण्यास मदत झाली आहे. क्षयरोग हा संसर्गजन्य रोग आहे. बर्लिन येथे सर रॉबर्ट कॉक यांनी 24 मार्च 1882 रोजी क्षयरोगाच्या जंतुंचा शोध लावला म्हणून 24 मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन साजता केला जातो. जगातील एकूण क्षयरुग्णांपैकी 21 टक्के क्षयरुग्ण भारतात आहेत. प्रतिवर्षी जवळपास 18 लाख नवीन रुग्णांची भर पडते यामध्ये 8 लाख थंुंकीदूषित क्षयरुग्ण असतात. क्षयरोग हा प्राधान्याने फुफ्फुसांना होणारा आजार आहे. श्वसनक्रियेतून हवेतून प्रसारामुळे एका वर्षात क्षयरुग्णाच्या थुंकीमुळे 10 ते 15 लोकांना क्षयरोग होतो. प्रत्येक वर्षी 3 लक्ष म्हणजे प्रत्येक दीड मिनिटाला एक रुग्ण क्षयरोगाने मरण पावतो.
राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम 1993 पासून आपल्या देशात सुरु झाला. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 2000 पासून अंमलबजावणी सुरु झाली. कोल्हापूर जिल्ह्यात 2012 मध्ये 2889 एकूण क्षयरुग्ण होते यामध्ये थुंकीदुषित 1457, थुंकी अदुषित 513 रुग्णांचा समावेश होता. 2013 मध्ये 2725 रुग्णांपैकी थुंकीदुषित 1559, थुंकी अदुषित 419 रुग्ण, 2014 मध्ये 2921 रुग्णांपैकी थुंकीदुषित 1450, थुंकी अदुषित 528 रुग्ण, 2015 मध्ये 2621 रुग्णांपैकी थुंकीदुषित 2621, थुंकी अदुषित 429 रुग्ण, जानेवारी व फेब्रुवारी 2016 मध्ये थुंकीदुषित 421, थुंकी अदुषित 54 रुग्ण होते. यामध्ये एमडीआर-टीबी या औषधोपचाराला न जुमानणाऱ्या क्षयरोगामध्ये 2012 ते 16 मार्च 2016 अखेर 175 रुग्णांचा समावेश आहे. डॉट्स पद्धतीमुळे क्षयरुग्ण पूर्ण बरा करण्याची जबाबदारी आरोग्य कर्मचाऱ्यावर राहते त्यामुळे सामाजिक धोका कमी होतो. ही पद्धती मोफत व जास्त परिणामकारक आहे. CBNATT मशिनमुळे रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात निश्चितच वाढ होईल असे डॉ. वेदक म्हणाल्या.
24 मार्च या जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जनजागरण सप्ताह आयोजिण्यात आला असून, यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी स्लोगन स्पर्धा, 21 मार्चरोजी नर्सिंग विद्यार्थीनींसाठी रांगोळी स्पर्धा, विद्यार्थ्यांसाठी पोस्टर स्पर्धा 22 मार्चरोजी सीपीआर आवारात भव्य रॅली व पथनाट्य, 23 मार्चरोजी रुग्णांना फळे वाटप, 24 मार्चरोजी फळे वाटप व अन्य कार्यक्रम, 28 मार्चरोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे प्राद्यापकांसाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून, आकाशवाणीवर टी. बी. चर्चासत्र तसेच सीपीआर, दसरा चौक, बिंदू चौक, शिवाजी पुतळा, महापालिका चौक व परत सीपीआर अशी रॅली असे जनजागरण सप्ताहानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
Leave a Reply