केंद्राच्या राष्ट्रीय क्रमवारीत शिवाजी विद्यापीठ २८वे; राज्यातील अकृषी विद्यापीठांत पहिले

 

 

कोल्हापूर 20151117_205227-BlendCollageनॅक (बंगळूर)च्या पुनर्मूल्यांकनामध्ये ३.१६ सीजीपीए मूल्यांकनासह राज्यातील सर्वश्रेष्ठ विद्यापीठ ठरलेल्या शिवाजी विद्यापीठाने आता केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या नॅशनल इन्स्टिट्यूशनल रॅंकिंग फ्रेमवर्क (एन.आय.आर.एफ.) या राष्ट्रीय क्रमवारीत २८वे तर महाराष्ट्रातील अकृषी विद्यापीठांमध्ये पहिले स्थान पटकावले आहे.
केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयातर्फे नॅशनल इन्स्टिट्यूशनल रॅंकिंग फ्रेमवर्क (एन.आय.आर.एफ.) ही देशातल्या टॉप-१००विद्यापीठे व शैक्षणिक संस्था यांची क्रमवारी आज जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये महाराष्ट्रातील सात शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे. त्यामध्ये तीन अकृषी विद्यापीठे आहेत. यात शिवाजी विद्यापीठ २८व्या स्थानी आहे, तर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद हे अनुक्रमे ५९ व ८७व्या स्थानी आहेत.
याखेरीज शिवाजी विद्यापीठाशी संलग्नित दोन महाविद्यालयांनीही टॉप-१०० महाविद्यालयांच्या यादीत स्थान मिळविले आहे. अभियांत्रिकी शैक्षणिक संस्थांच्या क्रमवारीत कासेगाव शिक्षण संस्थेच्या राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, इस्लामपूर या महाविद्यालयाने राष्ट्रीय क्रमवारीत ७५वे तर राज्यस्तरीय यादीत सातवे स्थान मिळविले आहे. फार्मसी संस्थांच्या यादीत कोल्हापूर येथील भारती विद्यापीठाच्या फार्मसी महाविद्यालयाने राष्ट्रीय क्रमवारीत २५वे तर राज्यस्तरीय यादीत पाचवे स्थान मिळविले आहे.
विविध खाजगी संस्था विविध प्रकारच्या निकषांवर शैक्षणिक संस्थांच्या निरनिराळ्या क्रमवारी प्रसिद्ध करीत असतात. तथापि, या पद्धतीमध्ये सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दि. २९ सप्टेंबर २०१५ रोजी नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्कची निर्मिती केली. अध्यापन-अध्ययन प्रक्रिया, संशोधनपर व व्यावसायिक कृतीशीलता, विद्यार्थ्यांचे उत्तीर्णतेचे प्रमाण, महिलांसह विविध वंचित समाजघटकांपर्यंत शिक्षण पोहोचविण्याचे प्रयत्न आणि विद्यापीठाशी संबंधित विविध घटकांशी संवाद व समन्वय या निकषांवर ही क्रमवारी आधारित आहे. विद्यापीठे व महाविद्यालये यांच्यासाठीच्या क्रमवारीखेरीज अभियांत्रिकी, व्यवस्थापन, फार्मसी, आर्किटेक्चर या क्षेत्रांतील विशेष शैक्षणिक संस्थांचीही स्वतंत्र क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे.
 
अभिमानास्पद व जबाबदारीची जाणीव करून देणारी कामगिरी आहे असे  कुलगुरू डॉ. शिंदे यांनी आपले मत व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!