कोल्हापूर: श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे 12 ऑगस्ट पासून सुरु होणाऱ्या कन्यागत महापर्वकाळ सोहळ्याच्या जय्यत तयारीसाठी प्रशासकीय यंत्रणा गतिमान झाल्या असून घाटांची उभारणी, घाटावरील विद्युतिकरण, रस्ते, पार्किंग आदी सर्व पायाभुत सुविधांची उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
दर बारा वर्षांनी येणारा कन्यागत महापर्वकाळ सोहळा येत्या 12 ऑगस्ट पासून भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यासाठी प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधी, देवस्थान समिती, ग्रामपंचायत तसेच स्थानिक नागरिक आणि पदाधिकारी यांनी या कामी सक्रीय योगदान दिले असून या सोहळ्याच्या यशस्वितेसाठी सर्वजण अहोरात्र कार्यरत आहेत.पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी सर्व विकास कामांचा सुक्ष्म आराखडा तयार करुन त्या नुसार सर्व यंत्रणांना सक्रीय केले आहे. या उपक्रमामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच पदाधिकाऱ्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेऊन कन्यागत महापर्वकाळ सोहळ्याची जय्यत तयारी सुरु केली आहे.
राज्य शासनाच्यावतीने कन्यागत महापर्वकाळ सोहळ्यासाठी 121 कोटीचा निधी मंजूर करण्यात आल्याचे आमदार उल्हास पाटील यांनी या प्रसंगी स्पष्ट केले. ते म्हणाले, पहिल्या टप्प्यात कन्यागत सोहळ्यासाठीच्या आवश्यक पायाभूत सुविधा पूर्ण करण्यासाठी 65 कोटीचा निधी उपलब्ध करुन दिला असून यापैकी 60 ते 62 कोटी रुपयांचा निधी प्रशासकीय यंत्रणांच्या माध्यमातून नृसिंहवाडी येथील विकासकामांवर खर्च करण्यात आला आहे. ही कामे अतिशय दर्जेदार आणि आकर्षक करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. कन्यागत महापर्वकाळ सोहळ्यामध्ये भाविकांची गैरसोय होणार नाही या दृष्टीने प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेऊन त्या त्या उपाययोजना गतिमान केल्या आहेत. कन्यागत महापर्वकाळानिमित्त करण्यात येत असलेल्या उपाय योजना अधिक गतिमान करणाऱ्यावर जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी विशेष लक्ष केंद्रीत केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. कन्यागत महापर्वकाळ सोहळ्यामध्ये श्रींच्या उत्सव मुर्तीचे 12 ऑगस्ट रोजी सुर्योदयाला, शुक्लतीर्थ येथे स्नान झाल्यानंतर कन्यागत महापर्वकाळ सोहळ्यास प्रारंभ होतो. त्यामुळे 104 मिटरच्या शुक्लतीर्थ घाटाची आकर्षक आणि दर्जेदार बांधणी केली असून या ठिकाणी मोठा घाट तयार करण्यात आला आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
कन्यागत महापर्वकाळ हा दर 12 वर्षांनी संपन्न होतो. कन्या राशीमध्ये गुरु ग्रहाचे वास्तव्य 13 महिने असते. या पुण्यपावन काळामध्ये गंगा नदी कृष्णा नदीच्या भेटीला येते व पर्वकाल संपन्न होईपर्यंत कृष्णा नदीच्या सहवासात वास्तव्य करते,अशी महती असल्याचे सांगून श्री क्षेत्र नृसिंहवाडी देवस्थान समितीचे सचिव संजय पुजारी म्हणाले, कृष्णा आणि पंचगंगा या दोन पवित्र नद्यांच्या संगमाकाठी वसलेले श्री क्षेत्र नृसिंहवाडी तीर्थक्षेत्र.श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे कृष्णा तीरावर शुक्लतीर्थ, पापविनाशितीर्थ, काम्यतीर्थ, सिध्दवरदतीर्थ अमरतीर्थ, कोटीतीर्थ, शक्तीतीर्थ व प्रयागतीर्थ अशी अष्टतीर्थे आहेत, कन्यागत महापर्व काळात अष्टतीर्थ स्नानास अनन्य साधारण धार्मिक महत्व आहे. कन्यागत सोहोळ्याचे मुख्यस्थान हे अष्टतीर्थांपैकी एक असे शुक्लतीर्थ आहे,

Leave a Reply