
कोल्हापर – तिसऱ्या जगातील राष्ट्रांमध्ये असणाऱ्या धार्मिक बहुविविधतेमुळे शांततामय सहजीवनाची जास्त आवश्यकता आहे, असे गोवा येथील झेवियर सेंटर ऑफ हिस्टॉरिकलचे संचालक डॉ.सॅव्हिओ अब्रेव यांनी प्रतिपादन केले.शिवाजी विद्यापीठाचा इतिहास अधिविभाग आणि असोसिएशन ऑफ थर्ड वर्ल्ड स्टडीज यांच्या संयुक्तविद्यमाने विद्यापीठाच्या भाषा भवन सभागृहामध्ये आयोजित ^ धर्म, संस्कृती आणि शांततामय सहजीवन – तिसऱ्या जगातील देशांची भूमिका* या चर्चासत्रामध्ये बिजभाषण देताना ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक महेश काकडे उपस्थित होते. दि.30 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर अखेर संपन्न होत असलेल्या या चर्चासत्राचे उद्धाटन विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांनी केले.डॉ.सॅव्हिओ अब्रेव पुढे म्हणाले, पाश्चात्य देशांमध्ये आशियाई धर्मांबद्दलचे आकर्षण सध्या वाढू लागलेले दिसते. विशेषत: न्यूयॉर्क किंवा शिकागो सारख्या महानगरांमध्ये बौध्द धर्माचा प्रचंड प्रभाव आहे. सर्वच धर्माच्या धर्मग्रंथामध्ये हिंसेचे संदर्भ येतात. पण बौध्द धर्म हा त्याला अपवाद आहे. कारण त्याचा पाया करुणेवर आधारलेला आहे. त्यामुळे कोणत्याच प्रकारची हिंसा बौध्द धर्म पुरस्कृत करीत नाही. उलट त्यातली अहिंसा ही संकल्पना पुढे महात्मा गांधीजींनी राजकीय व्यूहरचना म्हणून यशस्वीरित्या वापरली,असोसिएशन ऑफ थर्ड वर्ल्ड स्टडीजचे अध्यक्ष डॉ.जेम्स डॅनियल यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रा.के.सदाशिवन यांनी संघटनेचा मागील अधिवेशनाचा अहवाल सादर केला. उपाध्यक्ष पी.वसुमतीदेवी यांनी असोसिएशन ऑफ थर्ड वर्ल्ड स्टडीजबद्दल थोडक्यात माहिती दिली.अध्यक्षस्थानावरुन बोलताना परीक्षा नियंत्रक महेश काकडे म्हणाले, बहुविद्यापीठीय स्वरुप असलेल्या चर्चासत्रामुळे विद्यार्थी व संशोधक यांना निश्चित लाभ होईल.उद्धाटन समारंभाचे स्वागत व प्रास्ताविक इतिहास विभागप्रमुख प्रा.पद्मा पाटील यांनी केले. प्रा.पद्मा पाटील यांनी चर्चासत्र अयोजनाची भूमिका स्पष्ट केली.यावेळी विद्यापीठाच्या सेंटर फॉर व्हीज्युअली इंपेअर्ड यांना असोसिएशनच्यावतीने हेलन अझारिया मेमोरियल यांच्या वतीने एक्सलन्स ॲवॉर्ड प्रदान करण्यात आले. सेंटरच्यावतीने प्रा.एम.एस.वासवानी यांनी हा पुरस्कार स्विकारला.असोसिएशनचे सेक्रेटरी के.सदाशिवन यांनी आभार प्रदर्शन केले. निलांबरी जगताप व ॲन्सी सी.एस. यांनी सूत्रसंचालन केले.दुपारच्या सत्रामध्ये पर्यावरण विषयक विषयांवर नऊ शोधनिबंधांचे वाचन करण्यात आले. या चर्चासत्रासाठी सुमारे दोनशे प्रतिनिधी उपस्थित झालेले आहे.
Leave a Reply