
मुंबई:स्टार प्रवाहवरील अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या ‘गोठ’ या मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून या मालिकेतल्या बयोआजी,राधा-विलास,नीला,अभय,दीप्ती,किशोर, या पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले आहे.नुकतेच या मालिकेचे शंभर भाग पूर्ण झाले.
तळकोकणाच्या पार्श्वभूमीवर संस्थाने संपली तरी तो आब रुबाब टिकवून ठेवणारी आणि सद्य परिस्थितीत पुन्हा एकदा जुन्या परंपरा आणि रुढींचा पुरस्कार करणारी बयोआजी आणि मुक्त मोकळा विचार करणाऱ्या प्रगतीशील घरातली आधुनिक राधा यांच्या आचारविचारातल्या संघर्षाची ही गोष्ट.त्याला एका जुन्या कौटुंबिक रहस्याची जोड आहे आणि काही अपरिहार्य कारणांमुळे राधा बयोआजीची सून म्हणून म्हापसेकरांच्या वाड्यात आली आहे.
कोकणच्या पार्श्वभूमीवर रंगणारी ही कथा अनेक स्थानिक संदर्भ,चालीरीती,परंपरा,बदलत्या काळातले त्यांचे संदर्भ नेमकेपणाने मांडते. बयोआजीच्या भूमिकेत नीलकांती पाटेकरांसोबत राजन भिसे,समीर परांजपे,रुपल नंद, सुशील इनामदार,विवेक गोरे,ऋता काळे,सुप्रिया विनोद,शलाका पवार,लतिका गोरे,विनायक भावे,नीलपरी गायकवाड,रुपाली मांगले या कसलेल्या कलावंतांच्या दमदार भूमिका हे या मालिकेचे बलस्थान आहे.
हिंदीतली आघाडीची निर्मितीसंस्था फिल्मफार्म आणि स्टार प्रवाह यांनी मालिकेच्या निर्मितीत वेगळे प्रयोग केले असून मराठीतले पहिले अंडरवॉटर चित्रीकरण,ड्रोन वापरून चित्रित केलेली दृश्य ते तंत्रकुशलतेची कसोटी पाहणारा अग्नीफेराही या मालिकेच्या निमित्ताने साकारला गेला. गुरु ठाकूरने लिहलेले,आदर्श शिंदेने गायलेलं आणि नीलेश मोहरीरने संगीतबद्ध केलेलं या मालिकेचे स्त्री शक्तीचा सन्मान करणारे शीर्षकगीतही लोकप्रिय ठरले आहे.
या पार्श्वभूमीवर या मालिकेच्या शंभर भागांचे सेलिब्रेशन सेटवर मोठ्या उत्साहात करण्यात आले,प्रेक्षकांना ही मालिका आवडते आहे,याची पोचपावती लोक आवर्जून येऊन भेटून देतात,फोन,इमेल,सोशल मिडिया मेसेजेसवरून देतातच,पण या सेलिब्रेशनलाही चाहत्यांनी उपस्थिती दर्शवली,हे विशेष,या प्रेमाच्या जोरावर ही मालिका अनेक उच्चांक गाठेल असा विश्वास बयोआजीच्या भूमिकेतल्या नीलकांती पाटेकर यांनी यावेळी व्यक्त केला.
Leave a Reply