
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात पोलीस दलाकडून 24 तास पुरेशी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाच्या अभ्यागत मंडळाची बैठक आज रुग्णालयाच्या सभागृहात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस आमदार अमल महाडिक, समितीचे सदस्य महेश जाधव, अजित गायकवाड, सौ. शितल रामगुडे, डॉ. सुरेखा बसरगे, डॉ. इंद्रजित काटकर, डॉ. अजित लोकरे, सुनिल करंबे, सुभाष रामगुडे यांच्यासह महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल.एस.पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिषिर मिरगुंडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर.एस.पाटील, पोलीस उपअधीक्षक भरतकुमार राणे, राजीव गांधी योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. सागर पाटील, यांच्यासह सर्वसंबंधित सदस्य, अधिकारी उपस्थित होते.
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सीपीआर आवारात पुरेशी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्याबरोबरच आवारातील अनधिकृत वाहनांच्या प्रवेशांना निर्बंध घालणे तसेच ॲम्ब्युलन्स, डॉक्टर्स व अन्य कर्मचाऱ्यांच्या वाहनासाठी पार्किंग आणि बॅरॅकेटींग अशा सुविधा प्राधान्याने उपलब्ध करुन देण्याची सूचना करुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, उद्यापासून सीपीआर रुग्णालयात 24 तास पोलीस बंदोबस्त राहील तसेच अपघात विभागात रुग्ण तपासणीसाठी आणताना रुग्णाबरोबर फक्त दोनच नातेवाईकांना प्रवेश दिला जाईल तर कक्षामध्ये अंतररुग्ण म्हणून असणाऱ्या रुग्णाच्या एका नातेवाईकास प्रवेश दिला जाईल. यासाठी आवश्यक असणारी पासची सुविधा तसेच रुग्णाला भेटण्याची वेळ तात्काळ निश्चित करण्याचे निर्देशही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
सीपीआर आवारातील अतिक्रमणे 1 एप्रिलपर्यंत संबंधितांनी स्वत:हून काढण्याच्या सूचना रुग्णालय प्रशासनाने द्याव्यात, अन्यथा 2 एप्रिल रोजी आवारातील 14 अतिक्रमणे काढण्याची कार्यवाही करण्याचे निर्देशही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिले. छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात सीटी स्कॅन कार्यान्वित करण्यात आले असून ट्रॉमॉयुनिट प्रयोगीक तत्वावर सुरु आहे. या दोन्ही सुविधा लवकरच आरोग्य मंत्र्यांच्या उपस्थितीत कायम स्वरुपी सुरु केल्या जातील, तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदाबाबत आरोग्य मंत्र्यांसमवेत चर्चा घडवून आणली जाईल, असेही यावेळी ठरविण्यात आले.
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतून जिल्ह्यातील अधिकाधिक रुग्णांनी छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात उपचार घ्यावेत, यासाठी रुग्णालय प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना करण्याबरोबरच या योजनेबाबत जिल्हाभर जागृती करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केल्या. या योजनेतंर्गत जिल्ह्यातील 32 रुग्णालयांचा समावेश असून आतापर्यंत जिल्ह्यातील 68 हजार 790 रुग्णांना लाभ देण्यात आला आहे. यामुळे 177 कोटी 80 लाखाचा फायदा जिल्ह्यातील रुग्णांचा झाला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाच्या अडचणी आणि समस्या तसेच बैठकीसमोरील विषयांवर अभ्यागत मंडळाच्या बैठकीत सविस्तरपणे चर्चा करण्यात आली.
Leave a Reply