
कोल्हापूर : छत्रपती संभाजीराजांचा जन्म १४ मे, इ.स. १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे पुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. छत्रपती संभाजी महाराज यांनी सर्व सुखांचा त्याग करून निरंतर ९ वर्षे स्वराज्याच्या रक्षणासाठी संघर्ष केला. छत्रपती संभाजी महाराज हे शूर, पराक्रमी तर होतेच, शिवाय रयतेच्या हिताला प्राधान्य देणारे ते आदर्श अधिपती होते. अशा या महापराक्रमी झुंझार महाराजांचे पापाची तिकटी येथे स्वखर्चातून पुतळा उभा करू, अशी ग्वाही आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे. छ. संभाजी महाराज यांच्या ३६० व्या जयंतीनिमित्त हिंदू महासभा यांच्या वतीने पापाची तिकटी येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी आमदार राजेश क्षीरसागर बोलत होते.
हिंदू महासभा कोल्हापूर यांचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह हिंदुत्ववादी संघटना पदाधिकारी यांच्या हस्ते छ. संभाजीराजे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी “जय भवानी, जय शिवाजी”, “छ. शिवाजी महाराज कि जय”, “छ. संभाजी महाराज कि जय”, अशा जयघोषाने पापाची तिकटी परिसर दणाणून सोडला.
यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छ. शिवाजी महाराजांच्या पश्च्यात स्वराज्याचा महामेरू पश्चिम महाराष्ट्र,कोकण, सह्याद्री डॊंगररांगांपासून नागपूरपर्यंत आणि उत्तर महाराष्ट्र, खानदेशापासून दक्षिण भारतात तंजावर पर्यंत पसरविणारे युगपुरुष छ. संभाजी महाराज हे प्रतिभासंपन्न राजे होते. छत्रपती शिवरायांनी स्वराज्यासाठी, रयतेसाठी “जगावे कसे? हे शिकविले तर त्यांच्याच छत्रछायेत वाढलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी प्राणाची आहुती देऊन “मरावे कसे”? हे शिकविले. अशा या महापराक्रमी राजांना अभिवादन म्हणून पुढच्या जयंतीच्या आत पापाची तिकटी येथे छ. संभाजी राजेंचा पुतळा स्वखर्चातून साकारणार आहे. या पुतळ्याच्या स्मारक सुशोभीकरणासाठी याआधी आपल्या स्थानिक विकास निधीतून रु. ५ लाखांचा निधी मंजूर केला असल्याचेही आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.
यावेळी नगरसेवक ईश्वर परमार, हिंदू महासभा, बजरंग दल, पतित पावन संघटना, ब्राह्मण महासभा, हिंदू एकता आंदोलन, हिंदू जनजागरण समिती आदी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थित होते
Leave a Reply