पर्यावरण दिनानिमित्त ‘गहिवर’ फाऊंडेशनतर्फे ‘व्हाईट गॉड’ या हंगेरियन सिनेमाचे प्रदर्शन

 
कोल्हापूर : पृथ्वीवरील जैव विविधता ही खरं तर पर्यावरणाची समृद्धीच त्यामुळे पृथ्वीवरील सर्व जीवांनी एकमेकांच्या अस्तित्वाचा आदर करायला हवा. प्रत्यक्षात मात्र तसं घडत नाही. वंशशुद्धी, वंशभेद या बाबतच्या आग्रहांमधून माणूस अनेकदा माणसांवर आणि प्राण्यांवरही जुलूम करतो. याचीच जाणीव करून देणारा ‘व्हाईट गॉड’ हा हंगेरियन सिनेमा गहिवर फाऊंडेशन या वर्षी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने बुधवार, दि. ७ जून २०१७ रोजी सायंकाळी सहा वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन येथे प्रदर्शित करणार आहे. या फिल्मसाठी सर्वांना मुक्त व मोफत प्रवेश आहे.
काही समविचारी व्यक्ती एकत्र येत ‘गहिवर फाऊंडेशन’ हे व्यासपीठ काही वर्षांपूर्वी आकाराला आले. गेल्या सात वर्षांपासून ‘गहिवर’ जागतिक पर्यावरणदिनाच्या निमित्ताने जगभरातील उत्कृष्ट माहितीपट किंवा सिनेमा यांचे मोफत प्रदर्शन करण्याचा उपक्रम राबवत आहे. हे वर्षी सिनेमा प्रदर्शनाचं आठवं वर्ष. ‘होम’, ‘ओशन्स’, ‘प्लॅस्टिक प्लॅनेट’, ‘संसारा’, ‘फ्लाय अवे होम’, ‘विंग्ज ऑफ लाईफ’ व ‘मंकी किंगडम’ अशा पर्यावरणविषयक सजग भान देणार्‍या फिल्म्स्च्या प्रदर्शनामुळे ‘गहिवर’ या वर्षी कोणती फिल्म दाखवणार याविषयी दरवर्षी उत्सुकता असते. पर्यावरणाचे जे विविध पैलू आहेत ते समोर आणण्याचा गहिवरचा नेहमीच प्रयत्न राहिला असल्याने केवळ नेत्रसुखद दर्‍याखोर्‍या, वनस्पती, पक्षी, प्राणी यांचे चित्रण असणार्‍या फिल्म्स पेक्षा काही वेगळेही दाखवण्याचा प्रयत्न गहिवर कडून होत असतो. ‘व्हाईट डॉग’ हा दिग्दर्शक कॉर्नेल मंड्रूकझोचा सिनेमा कथा म्हणून जे काही सांगतो त्यापलीकडचे खूप काही संवेदनशील मनांपर्यंत पोहोचवू शकणारा सिनेमा आहे.
‘व्हाईट गॉड’ या सिनेमाने कान्स व युरोपियन फॅन्टास्टिक फिल्म फेस्टिवलमध्ये जाणकारांचे लक्ष वेधून घेतलेले होते. लिली नावाची एक शाळकरी मुलगी आणि तिचा सखासोबती असणारा हेगन नावाचा कुत्रा यांना विशिष्ट परिस्थितीत एकमेकांपासून अलग व्हावे लागते आणि त्यांनंतर हेगनच्या आयुष्यात जे घडतं त्यामुळे एक थरारनाट्य जन्माला येते हे सिनेमाचे कथासूत्र. विशेष म्हणजे या सिनेमात काम करणार्‍या कुत्र्यांसाठी फेस्टिवलमध्ये ‘पाम डॉग ऍवॉर्ड’ नावाचा विशेष पुरस्कार जाहीर केला गेला होता. ऑस्कर ऍवॉर्डसाठीच्या परदेशी भाषा विभागात हंगेरी तर्फे या सिनेमाला अधिकृत नामनिर्देशनही मिळालेले होते. कॉर्नेल या हंगेरियन दिग्दर्शकाचा हा तिसरा सिनेमा. सध्या बेचाळीस वर्ष वय असलेल्या कॉर्नेलने २००८ मध्ये ‘डेल्टा’ हा सिनेमा केला होता तर २०१० मध्ये त्याचा ‘टेंडर सन – द फ्रँकेस्टाईन प्रोजेक्ट’ हा सिनेमा आला होता. २०१४ मध्ये आलेल्या १२१ मिनिटे लांबीच्या ‘व्हाईट गॉड’ मधून कथेबरोबरच योग्य संदेश पोहोचवण्यासाठी कॉर्नेलने तब्बल २७४ कुत्र्यांचा उपयोग करून घेतला आहे. म्हटलं तर जो कुत्रा सिनेमाचा कथानायक आहे त्या कुत्र्याची भूमिका ही दोन जुळ्या कुत्र्यांकडून करवून घेण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!