वाचन संस्कृतीची जोपासना महत्वाची:पालकमंत्री चंद्रकांत पाटील

 

कोल्हापूर. :- शिक्षित व सुसंस्कृत नवसमाजनिर्मितीसाठी वाचन संस्कृतीची जोपासना महत्वाची असल्याचे मत जिल्हयाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे बोलतांना व्यक्त केले.
जरगनगर येथील कै.भालचंद्र चिकोडे वाचनालयाच्यावतीने सुरु केलेल्या पुस्तकांची वारी- तुमच्या दारी या नाविण्यपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते. समारंभास कै.भालचंद्र चिकोडे वाचनालयाचे अध्यक्ष राहुल चिकोडे, निर्मितीचे अनंत खासबागदार, शिरीष खांडेकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री. जगताप, अडव्होकेट शिवप्रसाद पाटील, भालजी पेंढारकर फिल्म सोसायअीचे सचिव दिलीप बापट, उपेगपती नरेश चंदवाणी, प्रवीण पाटील, नाथाजी पाटील, अलकेश कांदेकर, दिपक शिरगांवकर आदि मान्यवर उपस्थित होते.
समाजात वाचन संस्कृती जोपासण्याच्या उदेशाने कै.भालचंद्र चिकोडे वाचनालयाच्यावतीने हाती घेतलेला पुस्तकांची वारी- तुमच्या दारी या उपक्रमाव्दारे समाजाला नवी दिशा मिळेश असा विश्वास व्यक्त करुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, या नाविण्यपूर्ण उपक्रमामुळे समाजात वाचन संस्कृती वाढीस लागेल, लहानमुलांना आपल्या घराजवळ तसेच परिसरात पुस्तके उपलब्ध झाल्यामुळे त्यांच्यात वाचनाची गोडी वाढून मुलांना लहानवयातच वाचनाची सवय लागेल , असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
वाचनामुळे समाज शिक्षित आणि सुसंस्कारीत बनतो, तसेच लहान मुलांमध्ये शालेय वयातच वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी कै.भालचंद्र चिकोडे वाचनालयाने सुरु केलेल्या पुस्तकांची वारी- तुमच्या दारी हा उपक्रम अतिशय उपयुक्त असून कोल्हापूर शहर तसेच उपनगरे आणि शहराजवळच्या गावातील विद्यार्थ्यांनी या फिरत्या वाचनालयाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी फिरत्या वाचनालयाच्या वाहनातील पुस्तकांची पाहणी करुन कोणकोणती पुस्तके उपलबध करुन दिली आहेत, याची माहिती घेतली, यापुढेही लहान मुलांसाठी अधिकाधिक पुस्तके उपलब्ध करुन देण्याची सूचना कै.भालचंद्र चिकोडे वाचनालयाचे अध्यक्ष राहुल चिकोडे यांना केली. तसेच या नाविण्यपूर्ण उपकमाचा त्यांनी मुक्त कठांनी गौरव केला.
प्रारंभी कै.भालचंद्र चिकोडे वाचनालयाचे अध्यक्ष राहुल चिकोडे यांनी पाहुण्याचे स्वागत करुन पुस्तकांची वारी- तुमच्या दारी या उपक्रमाची माहिती दिली. समारंभास अनेक मान्यवर, पदाधिकारी, नागरिक, वाचक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!