आव्हान-२०१७ मधे कुलगुरुंचा उस्फुर्त सहभाग

 

कोल्हापूर, दि. ५ जून: शिवाजी विद्यापीठात १ जूनपासून सुरू झालेले ‘आव्हान-२०१७’ हे राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबीर अत्यंत जोमाने सुरू आहे. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनीही काल दिवसभर या शिबिरातील विविध सत्रांत तसेच प्रात्यक्षिकांतही सहभाग घेतला.

या शिबिरांतर्गत सहभागी शिबिरार्थींना जल, भूमी व वायू यांच्या संदर्भातील कोणत्याही प्रकारची आपत्ती उद्भवली असता घ्यावयाची दक्षता आणि मदतकार्य याविषयी एनडीआरएफची टीम सकाळी सात वाजल्यापासूनच प्रशिक्षण देत आहे. जलविषयक आपत्ती व्यवस्थापनाविषयी राजाराम तलाव येथे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात येत आहे. उपलब्ध साहित्याचा वापर करून बचावकार्य कसे सुरक्षितरित्या पार पाडावे, तराफे कसे तयार करावेत, प्लास्टीक डबे, कॅन, बाटल्या, दोरांच्या सहाय्याने तात्पुरती जीवरक्षणाची सुविधा कशी उभारावी, या सर्वांचा या प्रशिक्षणात समावेश आहे. त्याचप्रमाणे पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीला शास्त्रशुद्ध पद्धतीने तसे वाचवावे, लाँचमधून मदतकार्य कसे पार पाडावे, याविषयी प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात येत आहे.

मोठमोठ्या इमारतींमध्ये आपत्तीत अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्याचे प्रशिक्षण दूरशिक्षण केंद्र इमारतीमध्ये देण्यात येत आहे. दोरखंडांच्या सहाय्याने एनडीआरएफचे जवान चित्तथरारक पद्धतीने इमारतींच्या भिंतीवर प्रात्यक्षिके सादर करून मुलांना मार्गदर्शन करीत आहेतच, शिवाय, सहभागी विद्यार्थी-विद्यार्थिनीही न घाबरता या प्रात्यक्षिकांत सहभागी होत आहेत. तात्पुरता रोप-वे अल्पावधीत तयार करून इमारतीत अडकलेल्या व्यक्तींची निर्धोक पद्धतीने जलदरित्या कशी सुटका करावी, याचेही प्रशिक्षण शिबिरार्थींना दिले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!