कोल्हापूर : क्वॉलिटी कौन्सिल ऑफ इंडियामार्फत झालेल्या सर्व्हे नुसार कोल्हापूर जिल्हा देशात 5 व्या क्रमांकावर होता. यापुढे पहिला क्रमांक मिळविण्यासाठी घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनामध्ये सर्वांनी कसोशीने नियोजनपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. पर्यावरण समतोल राखण्याचे संस्कार लहानपणापासून बिंबवले पाहिजेत. स्वच्छतेबाबत जनजागृती करुन लोक सहभाग वाढविला पाहिजे. याचाच एक भाग म्हणून पंचगंगा प्रदुषणमुक्तीचे काम प्रभावीपणे राबविण्यात येईल. पुनर्बाधणी, पुनर्रचना आणि पुनर्व्यवस्थापन करत असताना परंपरा आणि आधुनिकता याचा ताळमेळ घालणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी केले.
जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्हा परिषदेअंर्तगत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन कार्यशाळेचे जिल्हा परिषदेमार्फत आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक मार्गदर्शन करीत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमणार, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, बांधकाम समिती सभापती सर्जेराव पाटील पेरीडकर,शिक्षण सभापती अंबरिशसिंह घाटगे, जि.प. अतिरिक्त कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख, जि.प. सदस्य बंडा पाटील, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा देसाई, अवनी संस्थेच्या अनुराधा गुरव, पर्यावरण तज्ञ उदय गायकवाड, किर्लोस्कर ऑईल कंपनीचे उपाध्यक्ष श्री. गावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्वच्छतेबाबत लोकांमध्ये जागृती होऊन जनतेचा सहभाग वाढल्याशिवाय कोणताही उपक्रम यशस्वी होऊ शकत नाही असे सांगून शौमिका महाडिक म्हणाल्या, पर्यावरण संवर्धनासाठी लोकांच्या विचारधारेला अनुसरुन समुपदेशन केले गेले पाहिजे. जलसाक्षरता ही काळाजी गरज असल्याने तसेच पाणी हे शाश्वत विकासाचे स्त्रोत असल्याने त्याबाबत जनजागृती काळाची गरज आहे. नद्यांची स्वच्छता राखणे आवश्यक असून पुनर्बाधणी, पुनर्रचना आणि पुनर्व्यवस्थापन करत असताना परंपरा आणि आधुनिकता यांचा ताळमेळ घालणे आवश्यक आहे. यावेळी त्यांनी जिल्हा परिषद शाळा आणि कार्यालये या ठिकाणी मोठे आणि दिर्घकाळ राहणारे वृक्ष लावा अशी सूचनाही संबंधितांना केली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कुणाल खेमणार,म्हणाले पंचगंगा प्रदुषण नियंत्रणाबाबतच्या उपाययोजना या वैयक्तिक आणि सामुहिक या दोन्ही पातळ्यावर राबविल्या पाहिजेत. नदीमध्ये संपूर्ण निसर्ग ओसडत असतो त्याच्या संवर्धनासाठी प्रत्येकांने प्रयत्नशील राहिले पाहिजे. कोणताही विकास निसर्गाचे शोषण करुन होऊ शकत नाही. सद्याचा होणारा ऱ्हास पाहता पुढील पिढीला आपण काय देणार हा मोठा प्रश्न आहे. येत्या काळात जिल्हा परिषदेमार्फत सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनाबाबतच्या उपाययोजनांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सांगून पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी लोक सहभाग वाढविण्यात येईल असेही स्पष्ट केले.
किर्लोस्कर ऑईल कंपनीचे गावडे यांनी पर्यावरणीय समस्या सोडविण्यासाठी किर्लोस्कर उद्योग समुह कटिबध्द आहे. त्याचाच एक भाग म्हणून किर्लोस्कर वसुंधरा फिल्म फेस्टिवलचे आयोजन करण्यात येते आणि त्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचे विषय हाती घेतले जातात. उद्योग समुहाचे सर्व कारखाने शून्य कचरा संकल्पना राबवितात. सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी एखादे गाव दत्तक घेऊन ते आदर्श मॉडेल करण्याचा व्यवस्थापनाचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply