
गोवा – गेल्या 30 वर्षांत सातत्याने होत असलेल्या युद्धामुळे श्रीलंकेतील हिंदूंची संख्या मोठ्या प्रमाणात घटत आहे. 30 टक्के असलेली हिंदूंची संख्या आज 15 टक्के म्हणज केवळ 20 लक्ष राहिली आहे. धर्मांतरित होण्यासाठी हिंदूंवर सातत्याने दबाव टाकण्यात येत आहे. त्यामुळे श्रीलंकेतील हिंदूंना न्याय देण्यासाठी भारतातील हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि राजकीय पक्ष यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे भावनिक आवाहन श्रीलंका येथील 76 वर्षीय मरवनपुलावू सच्चिदानंदन् यांनी केले. ते गोव्यातील रामनाथी देवस्थान येथे होत असलेल्या सहाव्या ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’त दुसर्या दिवशी ‘विदेशी हिंदूंची सुरक्षा’ या विषयावरील सत्रात बोलत होते.
या वेळी ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’ या संघटनेचे अध्यक्ष अधिवक्ता रवींद्र घोष म्हणाले, ‘‘बांगलादेशात हिंदूंची स्थिती अत्यंत दयनीय असून लहान-सहान कारणांवरून हिंदूंना कारागृहात टाकण्यात येतेे. कितीही अडचणीची स्थिती असली, तरी शेवटच्या श्वासापर्यंत बांगलादेशातील हिंदूंसाठी लढा देऊ.’’
ओडिशा येथील भारत रक्षा मंचचे राष्ट्रीय सहसंयोजक श्री. मुरली मनोहर शर्मा म्हणाले, ‘‘निसर्गापासून प्रत्येक ठिकाणी देव सर्वत्र असल्याची शिकवण केवळ हिंदु धर्मच देतो. त्यामुळे जगाला विनाशापासून वाचण्यासाठी हिंदु धर्मच आवश्यक आहे.’’ या सत्रात ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’चे आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक पू. सिरियाक वाले यांनी ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशनचे कार्य विषद केले.
‘लोकराज्याची निरर्थकता’ या विषयावरील चर्चासत्रात बोलतांना चंदीगड येथील ‘नॅशनल सेंटर फॉर हिस्टॉरिकल रिसर्च अॅण्ड कम्पॅरिटिव्ह स्टडी’चे अध्यक्ष श्री. नीरज अत्री म्हणाले, ‘‘एन.सी.ई.आर्.टी.’च्या माध्यमातून वेदांच्या अपकीर्तीचे षड्यंत्र रचले जात आहे. गुलामगिरीसारख्या प्रथा वेदांमध्ये असल्याची खोटी माहिती या केंद्रीय स्तरावरील अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे.’’
या वेळी झारखंड येथील ‘तरुण हिंदू’ या संघटनेचे अध्यक्ष डॉ. नील माधव दास म्हणाले, ‘‘धर्मनिरपेक्षतेच्या माध्यमातून हिंदु संस्कृती, भाषा, देश यांच्या मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न चालू आहे.’’ ‘पनून काश्मीर’चे अध्यक्ष डॉ. अजय च्रोंगू म्हणाले, ‘‘काश्मीरमध्ये सध्या फुटीरतावाद ही मुख्य समस्या नसून काश्मीरमध्ये ‘एक संपूर्ण युद्ध’ अर्थात् ‘जिहाद’ चालू आहे. तेथील हिंदूंच्या दमनासमवेत जम्मू-काश्मीरला भारतीय संघराज्यापासून तोडून त्याला स्वतंत्र करण्याचे षड्यंत्र चालू आहे.’’
Leave a Reply