
कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई ही शिवपत्नी पार्वती आणि मराठ्यांची योद्धा दुर्गा आहे. भारतात ब्रिटीशपूर्व काळात प्रत्येक संस्थानातील मंदिरे हि त्या त्या राजांच्या मालकीची होती. कोल्हापूर संस्थान हे छत्रपतींचे संस्थान आहे. त्यामुळे त्याची मालकी स्वातंत्र्यापर्यंत छत्रपती शाहू महाराज, छ. राजाराम महाराज यांच्याकडे होती. छ. राजाराम महाराजांच्यानंतर देवसाचे राजे, त्यानंतर नागपूरचे भोसले दत्तक आले. या कालावधीत अंबाबाई मंदिराच्या व्यवस्थापनांत संबंधितानी अनेक गोंधळ घातले आहेत. याची माहिती नसल्याने कोणीही स्वत:ला हक्कदार श्रीपुजक अशी बिरुदावली लावू लागले. पण छ. शाहू महाराजांनी आपल्या वटहुकमाव्दारे १४ मे १९१३ रोजी ठराव नं ८२१ मध्ये अत्यंत परखड आणि स्पष्टपणे नियमावली, आचारसंहिता जाहीर केली आहे. हा वटहुकूम बदलण्याचा अधिकार संस्थानाच्या कोणाही नोकराला नाही. या अव्वल हुकुमानुसार माधवराव जोशीराव हे श्री करवीर निवासीनीकडील कामगार आहेत. त्या वेळी फक्त ५ पुजारी मंदिरातील पूजा व देखरेखीसाठी होते. त्याचे आता ५० झाले. तसेच १० रुपयाच्या आतील भक्तांनी दिलेल्या देणग्या आणि तसेच खण, लुगडी एवढ्यावरच फक्त या पुजाऱ्यांचा हक्क असेल त्या वरील सोन्या, चांदीचे दागिने, भांडी, महावस्त्रे, पैठणी आदी वस्तू सरकारकडे जमा करावीत असा उल्लेख त्यात आहे. सरकारकडील रक्कमेतून भक्तांच्यासाठी सोयी, गावात शाळा, पाण्याचा सोयी आदी मुलभूत सुविधा करण्याचा छ. शाहू महाराजांचा मानस होता पण त्यांच्या नंतर आता पर्यत करोडो रुपयांचे उत्पन्न घेवून पुजारी श्रीमंत झाले त्याचा विनियोग एकाही चांगल्या गोष्टीसाठी झाला नाही उलट मूर्तीची जी आताची दुरवस्था आहे त्याला पुजारीच जबाबदार आहेत. अशा थेट आरोप डॉ. सुभाष देसाई यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
अंबाबाईला तिरुपतीची पत्नी महालक्ष्मी म्हणणे, डोक्यावरील नाग मुद्दाम गायब करणे घागरा चोळी नेसवून तिची विटंबना करणे, अशा अनेक गोष्टीमुळे तीर्थक्षेत्र बदनाम होत आहे यालाही श्रीपुजच जबाबदार आहेत. पंढरपूर देवस्थान प्रमाणे यांचीही हकालपट्टी करावी अशी मागणी डॉ. सुभाष देसाई यांनी केली. तसेच मूर्तीच्या संरक्षणासाठी मूर्तीस वज्र कवच घालणे गरजेचे आहे असे शिल्पकार अशोक सुतार यांनी सांगितले. अशोभनीय वर्तन करणाऱ्या पुजाऱ्यांपासून मंदिर मुक्त करावे अशी मागणी शरद तांबट यांनी केली
Leave a Reply