
कोल्हापूर: सनातनचा साधक समीर गायकवाडला सशर्त जामीन मंजूर करत तब्बल 21 महिन्यांनी त्याची सुटका झाली. समीर गायकवाडला महाराष्ट्राबाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी समीर गायकवाडला 16 सप्टेंबर 2015 ला सांगलीतून अटक केली होती. तेव्हापासून समीर गायकवाड कळंबा कारागृहात कोठडीत होता. समीरच्या सुटकेसाठी तब्बल 31 वकिलांची फौज तैनात होती. मात्र, चौकशीत सहकार्य न करत असल्यामुळे समीर गायकवाडचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. या प्रकरणी गेल्या 2 आठवड्यापासून कोल्हापू च्या कोर्टात समीरच्या जामिनाची सुनावणी सुरू होती, आणि आज त्याला 25 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन देण्यात आलाय.
महाराष्ट्र राज्य सोडून बाहेर जायचं नाही, पासपोर्ट कोर्टाच्या ताब्यात द्यायचा, कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करायचा नाही, दर रविवारी तपास यंत्रणांकडे हजेरी लावायची ह्या अटींवर समीरला जामीन देण्यात आलाय. हा जामीन म्हणजे तपास यंत्रणांना मोठा दणका असून यावर उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं मेधा पानसरे यांनी सांगितलंय.
दरम्यान, आतापर्यंत चौकशीत समीर गायकवाड हा आरोपी असल्याचं सिद्ध झालंय.कळंबा कारागृहात झालेल्या ओळख परेडमध्ये प्रत्यक्षदर्शी 14 वर्षांच्या शाळकरी मुलांनी ओळखलं होतं. एवढंच नाहीतर समीरची गुजरातच्या वैद्यकीय लॅबकडून ‘सस्पेक्ट डिटेक्शन टेस्ट’ करण्यात आली. त्यातही समीर संशयास्पद आढळलाय. तसंच समीरची मैत्रीण असलेल्या ज्योती कांबळे हिच्याशी समीरने फोनवरून केलेल्या संभाषणावरून त्याला अटक करण्यात आली होती. या संभाषणात त्याने पानसरेंच्या खुनाचा उल्लेख केला होता. ‘पानसरेंना मी कसं संपवलं हे माहीत आहे ना तुला’, असं तो दोन वेळा बोलला होता.
Leave a Reply