शिवाजी विद्यापीठाच्या ऑनलाइन बुक स्टोअरचे उद्घाटन

 

कोल्हापूर: कुलगुरू पदाच्या कारकीर्दीस दोन वर्षे पूर्ण होत असतानाच विद्यापीठाच्या स्वतंत्र ऑनलाइन बुक स्टोअरचे उद्घाटन तथा लोकार्पण करीत असताना होणारा आनंद अवर्णनीय आहे, अशी भावना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे व्यक्त केली.

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या कारकीर्दीस आज दोन वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्त शिवाजी विद्यापीठाच्या प्रकाशने विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘एसयुके ई- स्टोअर’चे तसेच ‘एम्प्लॉईज कॉर्नर’च्या विस्तारित सेवेचे आज कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात हा कार्यक्रम झाला.

कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, शिवाजी विद्यापीठाच्या प्रकाशने विभागातर्फे आजपर्यंत अनेक दर्जेदार पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले आहे. काही पुस्तकांना देशातूनच नव्हे, तर परदेशातूनही मागणी आहे. मात्र ही पुस्तके केवळ प्रकाशने विभागातच उपलब्ध होती. हा माहितीचा, ज्ञानाचा खजिना वाचकांसाठी खुला करण्याचे स्वप्न मी बाळगले होते. त्यानुसार, आज विद्यापीठाच्या स्वतंत्र ई-बुक स्टोअरचे दालन वाचकांसाठी खुले करीत असताना अत्यंत आनंद होतो आहे. सध्या अधिक मागणी असणारी पुस्तके या व्यासपीठावर उपलब्ध केली असली, तरी टप्प्याटप्प्याने अन्य पुस्तकेही या व्यासपीठावरून खरेदीसाठी उपलब्ध केली जातील. ग्राहक कोणत्याही डिजीटल, कॅशलेस पद्धतीने ही पुस्तके खरेदी करू शकणार आहेत. विद्यापीठाकडून प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तकांतील ज्ञान अशा प्रकारे वाचकांसाठी खुले करण्याच्या या प्रयत्नाचे वाचकांतून निश्चितपणे स्वागत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी विद्यापीठाचे प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले यांनी ‘एसयुके ई-स्टोअर’वरून पहिले पुस्तक खरेदी करून ते कुलगुरू डॉ. शिंदे यांना प्रदान केले.

त्याचप्रमाणे यावेळी विद्यापीठाच्या एम्प्लॉईज कॉर्नर या सुविधेद्वारे सेवकांना त्यांचे पगारपत्रक उपलब्ध करून देण्यात येत असे. त्यामुळे बराचसा कागद वाचविला गेला. आजपासून या व्यासपीठावर गुंतवणुकीचे विवरण आणि प्राप्तीकराचा अर्ज क्र. १६ही ऑनलइन उपलब्ध करून देण्यात आला. कुलगुरू डॉ. शिंदे यांच्यासह विद्यापीठाच्या वैधानिक अधिकाऱ्यांना या तिन्हीचे वितरण वित्त व लेखा विभागाच्या वतीने करण्यात आले. यावेळी मिडियाटेक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश शिंदे यांनी एसयुके ई-स्टोअरविषयी सादरीकरण केले. येत्या सोमवारपासून या स्टोअरची लिंक विद्यापीठाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!