वीर बाजीप्रभूदेशपांडे, वीर शिवा काशीद यांना पुण्यतिथीनिमित्त शिवसेना शाखा सिद्धाळा गार्डनच्यावतीने अभिवादन

 

कोल्हापूर : इ.स.२ मार्च १६६० रोजी सिद्दी जोहरने पन्हाळयास वेढा दिला होता यावेळी छत्रपती शिवाजीराजे पन्हाळा किल्ल्यावर अडकून पडले होते. मुसळधार पावसात सुध्दा सिद्दी वेढा सोडावयास तयार नव्हता. या कठीण प्रसंगी महाराजांनी सिध्दीस तहाचा निरोप धाडला त्यामुळे सिध्दी गाफील राहिला. वीर शिवा काशीद नावाच्या मावळ्याने छत्रपतींच्या वेशात सिध्दी जोहर यास तहाची बोलणी करण्यात गुंतवून छत्रपतींना पन्हाळ्याहून निसटण्यास पुरेसा अवधी दिला. वीर शिवा काशीद चे खरे रूप कळल्यावर सिध्दीने त्यांस ठार केले, तोवर छत्रपती विशाळगडाच्या वाटेवर होते. छत्रपती शिवरायांनी पन्हाळ्यावरून विशाळगडाकडे पलायन केल्याचे समजल्या- नंतर,सिद्दीने, सिद्दी मसूदला छत्रपतींच्या मागावर पाठवले व त्यांचा पाठलाग चालू झाला. मसूदच्या सैन्याने मराठ्यांना घोडखिंडीत गाठले, अशावेळी बाजीप्रभूंनी छत्रपतींना विशाळगडावर पोहोचून तोफानी इशारा करत नाहीत तोवर ही खिंड लढवली जाईल असे सांगितले. घोडखिंडीतील अतिशय चिंचोळ्या वाटेमुळे मराठ्यांनी मसूदच्या सैनिकांची कत्तल आरंभली, शरीराला असंख्य जखमा झाल्या असतानाही बाजीप्रभू,फ़ुलाजी, संभाजी जाधव, बांदल यांनी मोठा पराक्रम गाजविला.महाराज विशाळगडावर पोहोचल्यानंतर तोफांचा गजर झाला. इकडे घोडखिंडीत वीर बाजीप्रभूने तोफांचा आवाज ऎकल्यानंतरच समाधानाने आपला जीव सोडला. या युध्दात मराठ्यांचे जवळपास सर्वच ३०० मावळे कामी आले तर मसूदचे जवळपास ३००० सैनिक मारले गेले. वीर बाजीप्रभू व इतर मावळ्यांच्या पराक्रमाने घोडखिंड पावनखिंड म्हणून इतिहासात अमर झाली.

या ज्वलंत इतिहासात अजरामर झालेल्या वीर बाजीप्रभू देशपांडे आणि वीर शिवा काशीद यांची आज ३५७ वी पुण्यतिथी आज असून, या शूरवीरांना अभिवादन करण्याकरिता शिवसेना शाखा को.म.न.पा. प्र. क्र,४६ सिद्धाळा गार्डन यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. युवा नेते मा. ऋतुराज राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते वीर बाजीप्रभू देश्पांडे, वीर शिवा काशीद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी शाखाप्रमुख दिनेश साळोखे, युवा सेना शहरप्रमुख पियुष चव्हाण, शिवसेना उपशहरप्रमुख तुकाराम साळोखे, शिवसेना विभाग प्रमुख कपिल सरनाईक, ओंकार परमणे, बंटी साळोखे, कपिल केसरकर, किरण पोवार, ओंकार दिवेकर, निकीतेश पाटील, अमन काटकर यांच्यासह शाखेचे पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!