
कोल्हापूर: जिल्ह्यात ६० घरफोड्या करणाऱ्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या चोरट्यांकडून सुमारे दीड किलो सोने आणि १२७ ग्राम चांदीचे दागिने व रोख चार लाख रुपये असा ४८ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या चोरट्यांनी पश्चिम व मध्य महाराष्ट्रात २०० चोऱ्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मे महिन्यात दुसरा पंधरवड्यात कोल्हापूरात सलग ११ चोऱ्या झाल्या होत्या. ऐन उन्हाळ्यात झालेल्या या घटनांनी शहरात खळबळ माजली होती. सुट्टीसाठी बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरटे घरांना लक्ष्य करत होते. पोलिसांच्या विशेष पथकाने या चोरट्यांवर करडी नजर ठेवत चौघांना अटक केली. कळंब तालुक्यातील इटकूर येथून पोलिसांनी दत्तात्रय आत्माराम काळे ( २६ ) , रामेश्वर उर्फ पम्या छना शिंदे ( ३९ ) , राजेंद्र आबा काळे ( २५ ) व अनिल भगवान काळे ( ४५ ) या चौघांना अटक केली. पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यांनी जिल्ह्यात ६० ठिकाणी घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून दीड किलो सोन्याचे दागिने , १२७ ग्राम चांदीचे दागिने व रोख चार लाख रुपये असा ४८ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चोरी करताना ही टोळी नेहमीच चड्डी बनियानमध्ये जात असल्याने चड्डी बनियान टोळी म्हणून त्यांची दहशतनिर्माण झाली होती. या चोरट्यांकडून चोरीचे दागिने विकत घेणाऱ्या प्रशांत गोविंद वेदपाठक ( ३८ ) या सराफालाही अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. न्यायालयाच्या परवानगीनंतर चोरीचे दागिने, मुद्देमाल संबंधीतांना लवकरच परत करण्याचा पोलिसांचा प्रयत्न असल्याचे पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी सांगितले.
Leave a Reply