
कोल्हापुर : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स (केसीसी) आणि कोल्हापूर इन्व्हेस्टर्स असोसिएशन (केआयए) यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या सोमवारी (दि. १७ जुलै) वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटीविषयी सर्वसामान्य नागरिकांना सविस्तर माहिती करून देण्यासाठी ‘जीएसटी आणि आपण’ या विशेष खुल्या चर्चासत्राचे आयोजन केले आहे. येथील दसरा चौकातील शाहू स्मारक भवनमध्ये सायंकाळी ४.३० वाजता होणाऱ्या या चर्चासत्राचा नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केले.
डॉ. नांदवडेकर म्हणाले, केंद्र सरकारने १ जुलैपासून अंमलात आणलेल्या वस्तू व सेवा कराविषयी नागरिकांच्या मनात अनेक शंका, संभ्रम आहेत. ते दूर करण्यासाठी नागरिकांसाठी कोल्हापूर शहरात विशेष चर्चासत्र आयोजित करण्याचे निर्देश कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी दिले. त्यानुसार शिवाजी विद्यापीठाचे बँक ऑफ इंडिया अध्यासन यांनी केसीसी व केआयए यांच्या संयुक्त विद्यमाने हे चर्चासत्र आयोजित केले आहे. यामध्ये ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे.एफ. पाटील, केंद्र सरकारच्या जीएसटी विभागाचे उपायुक्त अश्विनकुमार हुके, सी.ए. सुनील नागावकर आदी मार्गदर्शन करणार आहेत. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते चर्चासत्राचे उद्घाटन होईल. यावेळी प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे, केआयएचे अध्यक्ष मनीष झंवर, केसीसीचे अध्यक्ष आनंदराव माने उपस्थित असतील, अशी माहितीही त्यांनी दिली.
डॉ. विजय ककडे यांनी यावेळी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी डॉ. जे.एफ. पाटील, मनीष झंवर उपस्थित होते.
Leave a Reply