
दिल्ली: लोकसभेतील आजच्या कामकाजात शून्य प्रहरात, लोकमहत्वांच्या विषयांमध्ये खासदार धनंजय महाडिक यांनी, गणेशमुर्तीवर आकारण्यात आलेल्या जीएसटीला जोरदार विरोध दर्शवला. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या चर्चेत, खासदार महाडिक म्हणाले, कोणत्याही कार्याची सुरुवात श्रीगणेशाच्या पूजनाने होते. तसेच संपूर्ण देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. सर्व जातीधर्माचे लोक या उत्सवात हिरिरीने सहभागी होतात. अशा परिस्थितीत देवदेवतांच्या मुर्तीवर २८ टक्के जीएसटी आकारण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे गणेशमुर्ती महागणार आहेत, याकडे खासदार महाडिक यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. प्रत्येकवर्षी मुर्तीसाठी लागणार्या कच्च्या मालाच्या दरात ८ ते १० टक्के वाढ होते. अशातच जीएसटी लागू झाल्यामुळे, मुर्तींचे दर खूपच वाढणार आहेत, असे त्यांनी सांगितले. १५ फुटी गणेशमुर्तीची किंमत २५ ते ३० हजार रुपयांनी वाढणार असल्याचे उदाहरण त्यांनी सभागृहाला दिले. सर्वसामान्यांच्या आस्था आणि भावनेचा हा प्रश्न असल्याचे खासदार महाडिक यांनी नमूद करुन, जीएसटी लागू करण्याच्या या निर्णयाला विरोध दर्शविला. विशेषतः महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होताे. प्रत्येक गावात आणि शहरात त्यासाठी तरुण मंडळे कार्यरत असतात. या सर्वांनाच या निर्णयाचा फटका बसणार असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. मुंबईतील लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ, पुणे येथील दगडूशेठ हलवाई गणेश मंडळ आणि कोल्हापुरातील सर्वच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा या निर्णयाला तीव्र विरोध आहे. बहुतांश मंडळांनी आणि गणेशभक्तांनी मे आणि जून महिन्यातच मुर्तीची नोंदणी केली आहे. पण जुलै नंतर जीएसटी लागू झाल्यामुळे, या सर्व भक्तांना जादा पैसे मोजावे लागणार आहेत. दुसरीकडे देवाची मुर्ती ही श्रद्धा आणि आस्थेची बाब असून, मुर्तींवर लादलेला जीएसटी तत्काळ हटवावा, अशी आग्रही मागणी खासदार महाडिक यांनी लोकसभेत केली. संबंधित खात्याला आपल्या भावना पोहचवू, असे अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी सांगितले. यापूर्वी मुर्तींवर कोणताही अतिरिक्त कर लागू नव्हता. पण जीएसटी समितीने गणेशमुर्ती तसेच इतर देवदेवतांच्या मुर्ती तयार करण्याचा व्यवसाय, कराच्या अधिपत्याखाली आणला असून, उच्चतम अर्थात २८ टक्के कर लागू केला आहे. त्यामुळे भाविक आणि मुर्तीकार या दोन्ही घटकांना फटका बसणार आहे. या पार्श्वभूमीवर खासदार धनंजय महाडिक यांनी गणेशमुर्ती आणि इतर देवदेवतांच्या मुर्तींचा विषय उपस्थित करुन, भाविकांना दिलासा मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे.
Leave a Reply