
कोल्हापूर : स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर महिलांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे आणि आर्थिक उत्पन्न मिळवण्याचे नवनवीन मार्ग शोधावेत असे आवाहन जयश्री चंद्रकांत (आण्णा) जाधव फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. दश्मिता सत्यजित जाधव यांनी केले.भेंडवडे (ता. हातकणंगले) येथे आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी भेंडवडेच्या सरपंच स्नेहल माने होत्या. तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस औद्योगिक सेल महासचिव अॅड. मनीषा रोटे प्रमुख उपस्थित होत्या.डॉ. दश्मिता जाधव म्हणाल्या, महिलांना स्वयंरोजगारातुन स्वाभिमानाकडे नेण्यासाठी, घे भरारी हे ब्रीद वाक्य निश्चित करून जयश्री चंद्रकांत (आण्णा) जाधव फाउंडेशन काम करीत आहे. वर्षभर विविध स्पर्धा, मनोरंजनात्मक व प्रबोधनात्मक कार्यक्रमातून महिलांच्या कलागुणांना वाव देण्यात येत आहे. विविध क्षेत्रामध्ये महिलांनी गरुड भरारी घ्यावी, तुमच्या पंखांमध्ये बळ देण्याचे काम फाउंडेशन करेल.ज्या महिलांना रोजगाराची आवश्यकता आहे, त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी, ज्या महिलांना लघु व्यवसाय करायचाय त्यांच्यासाठी व्यवसाय मार्गदर्शन शिबीर आणि ज्या महिलांनी विविध उत्पादन तयार केलेले आहेत, त्यांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी कटिबध्द असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस औद्योगिक सेल महासचिव अॅड. मनीषा रोटे यांनी सांगितले.फ्युचर जनरल लाइफ इन्शुरन्सच्या सीनियर सेल्स मॅनेजर नेहा यादव- इबुसे, सरपंच स्नेहल माने यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी काँग्रेस औद्योगिक सेलच्या हातकणंगले तालुका सचिव सविता पाटील, सुरेखा देसाई यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
Leave a Reply