खा.धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून कोल्हापूरात विकासकामांसाठी ७८ कोटी ९९ लाख रुपयांचा निधी

 

कोल्हापूर:राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून कोल्हापूरच्या विविध विकास कामांसाठी तब्बल 78 कोटी 99 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. खासदार महाडिक यांनी कोल्हापूर शहरातील आणि जिल्ह्यातील विविध विकास कामांचा ध्यास घेऊन, सातत्याने पाठपुरावा करून, हा निधी मंजूर करून आणला आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून कोल्हापूरला जास्तीत जास्त निधी मिळावा आणि विकासाच्या क्षेत्रात कोल्हापूर जिल्हा अग्रेसर व्हावा, यासाठी खासदार धनंजय महाडिक यांचा नेहमीच प्रयत्न असतो. त्याचाच एक भाग म्हणून सुमारे 78 कोटी 99 लाख रुपयांचा निधी त्यांनी खेचून आणला आहे. कोल्हापुरातील विमानतळाचे विस्तारीकरण असो किंवा बास्केट ब्रिज बाबतचा पाठपुरावा असो, खासदार महाडिक यांनी सातत्याने कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न आणि पाठपुरावा केला आहे. जिल्ह्याच्या दूरगामी विकासाचे प्रकल्प आखून ते सत्यात उतरवण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे. मंजूर झालेल्या 78 कोटी 99 लाख रुपयांच्या निधीतून होणाऱ्या कामांची माहिती आज खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

नागरिकांच्या मागणीनुसार शहरातील विकास कामे करणार
यापुढेही कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधी आणण्याचा खासदार धनंजय महाडिक यांचा निर्धार असून, त्यांनी एक अभिनव योजना आखली आहे. शहरातील नागरिकांनी त्यांच्या त्यांच्या प्रभागातील अत्यंत निकडीची विकास कामे खासदार महाडिक यांना सुचवावीत. नागरिकांच्या मागणीनुसार शहरातील सर्व 81 प्रभागात विकास कामे केली जातील. त्यासाठी नागरिकांनी आपल्या प्रभागातील प्राधान्याने आणि तातडीने करावयाच्या विकास कामांची माहिती, खासदार महाडिक यांच्या संपर्क कार्यालयात लेखी स्वरूपात आणून द्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

भाजपात प्रवेश करू इच्छिणाऱ्यांचे स्वागत :सर्वात मोठा जनाधार असलेला राजकीय पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीची ओळख आहे. संपूर्ण देशात आणि देशाबाहेरही भाजप हा लोकप्रिय आणि सर्वाधिक सदस्य संख्या असलेला पक्ष बनत आहे. अशावेळी कोल्हापूर जिल्ह्यातही भाजपची लोकप्रियता वाढली असून, अनेकांना भाजप पक्षात प्रवेश करावयाचा आहे किंवा भाजपचे सदस्यत्व घ्यायचे आहे. अशा नागरिकांनी खासदार धनंजय महाडिक यांच्या संपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा नागाळां पार्क येथील भाजपा कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहनही खासदार महाडिक यांनी यानिमित्ताने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!