कोल्हापूर : “दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचे कनिष्ठ सुपुत्र राहुल पी एन पाटील यांनी नुकताच अजित पवार राष्ट्रवादी गटात प्रवेश करण्याचा निर्णय पत्रकार परिषदेत घेऊन सांगितला. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, माझे वडील पी. एन पाटील यांनी आयुष्यभर ज्या विचारधारेने सर्वसामान्यांसाठी कार्य केले. त्याच कार्याचा वारसा आम्ही पुढे चालवणार आहोत. जनतेच्या हितासाठी आणि कार्यकर्त्यांच्या भल्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे.२५ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता सडोली येथे अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले या वेळेला संपूर्ण महायुतीमध्ये पी एन पाटील गट म्हणून काम करण्याची देखील ग्वाही त्यांनी यावेळी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील ‘शिव-शाहू ,फुले, आंबेडकरी’ विचारधारा मानणार आहे. यामुळे काम करताना कोणतीही अडचण येणार नाही .आम्ही फक्त पक्ष बदलला आहे, विचारधारा नाही “.अशी भूमिका जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पी.एन पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये मांडली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे , वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दिवंगत आमदार पी एन पाटील यांना मानणारा गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे.
राहुल पाटील म्हणाले दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी आमदार पी एन पाटील यांना जे पाठबळ दिले तशीच खंबीर साथ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपणाला देण्याची ग्वाही दिली आहे. राष्ट्रवादीत प्रवेश करण्यापूर्वी सगळ्या कार्यकर्त्यांशी, पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. पी.एन पाटील यांना मानणाऱ्या नेते मंडळींशी चर्चा झाली. विश्वासात घेऊनच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहे. तसेच सतेज उर्फ बंटी पाटील यांच्याशी बोलणे झाले असल्याचे त्यांनी सांगितले.आम्ही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असलो तरी स्थानिक स्वराज्य संस्था व अन्य निवडणुकीत पी एन पाटील गट म्हणूनच स्वतंत्रपणे निवडणुका लढवणार आहोत तशी चर्चाही उपमुख्यमंत्री पवार यांच्याशी झाली आहे. तसेच २०२९ची विधानसभा निवडणुकीला नरके गटाच्या विरोधात मी उमेदवार असणार आहे. जे विरोधक आहेत ते विरोधक असणार असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.पराभव झाल्यामुळे नाराज नाही. विधानसभा निवडणुकीत सर्वांचे मला सहकार्य झाले. पण जनतेच्या हिताची कामे व्हावीत कार्यकर्त्यांचा गट टिकावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशाचा निर्णय घेतला आहे. पी एन पाटील यांच्यावर प्रेम असणाऱ्या, आत्मीयता बाळगणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी सामुदायिकरित्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. माझ्यासह करवीर मतदार संघातील अनेक नेते आणि कार्यकर्त्यांना पी एन पाटील यांच्या विचार व कृतीवर नेहमीच विश्वास ठेवला. त्यांचे नेतृत्व आमच्या अभिमानाचा अस्मितेचा भाग आहै. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करताना आम्ही पी. एन.पाटील यांच्या विचार व कृती पासून दूर गेलो नाही. पी.एन.पाटील यांनी आयुष्यभर ज्या विचारधाराने सामान्य लोकांसाठी काम केले तीच विचारधारा आम्ही यापुढेही जपणार आहोत त्या पद्धतीने काम करणार आहोत पक्ष बदलला असला तरी विचारधारा बदलली नाही. पत्रकार परिषदेला जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेश पाटील, भोगावती कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव पाटील, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, बाजार समितीचे संचालक भारत पाटील भुयेकर, शंकरराव पाटील, बी एच पाटील, शिवाजीराव कवठेकर, चेतन पाटील, रामचंद्र बोगम, शिवाजी आडनाईक, संदीप पाटील, प्रकाश मुगडे, शिवाजी कारंडे, हंबीरराव वळके आदी उपस्थित होते.

Leave a Reply