कोल्हापूर:कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीतील शिवसेना,भाजपा प्रचारासाठी आयोजित विराट जनसभेत बोलताना, आई अंबाबाईचा आशीर्वाद महायुतीलाच मिळेल आणि पालिकेवर महायुतीचाच भगवा फडकेल असा विश्वास व्यक्त केला.
आई अंबाबाईचा आणि कोल्हापुरातील लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महायुतीसोबत आहे, त्यामुळेच इथली गर्दी पाहून विरोधकांची बोलती बंद झाली असेल. या सभेला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहता ही नुसती प्रचारसभा नसून विजयाची सभा असल्याचे मत यावेळी व्यक्त केले. प्रभू श्रीरामाने जसा १४ वर्षांचा वनवास सहन केला होता तसाच कोल्हापूरकरांनी १५ वर्षांचा काँग्रेस राजवटीचा वनवास सहन केला आहे, त्यामुळे आता परिवर्तनाची वेळ आली असून महायुतीला मत देऊन परिवर्तन घडवावे असे आवाहन याप्रसंगी कोल्हापूरकरांना केले.
कोल्हापूर हे कृषी, कुस्ती, सहकार, शिक्षण या सर्वच क्षेत्रात आघाडीवर असून त्याचा लौकिक असाच उन्नत ठेवण्यासाठी आपल्याला काम करायचे आहे. इथल्या तरुणाच्या हाताला इथेच काम मिळावे यासाठी प्रयत्न करायला हवेत. मी फक्त सभेसाठी कोल्हापुरात येत नाही. जेव्हा महापूर आला तेव्हाही कोल्हापुरात आलो, तेव्हा येथील जनतेचे प्रेम आणि आपुलकीचा अनुभव मी घेतला. त्यावेळी शिवसैनिकांनी देखील जीवास जीव देऊन पूरग्रस्त नागरिकांना मदत करण्याचा प्रयत्न केला. आपत्ती तिथे महायुती, संकट तिथे शिवसेना हा आमचा मंत्र आहे असे याप्रसंगी नमूद केले.
कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृह आणि खासबाग येथील मैदानाचा सुशोभीकरणासाठी ४० कोटी रुपये दिले, जुन्या नाट्यगृहाचे साडे सात कोटींचे काम पूर्ण केले, छत्रपती शाहू महाराजांचे समाधीस्थळासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाच्या नूतनीकरणासाठी आपण निधी दिलाय, रंकाळा तलावाच्या सुशोभीकरणासाठी २० कोटी दिले, शिंगणापूर पंपिंग स्टेशनसाठी साडे तीन कोटी दिले, शहरातील १६ मुख्य रस्त्यांचे काम सुरू आहे. कोल्हापूर शहरासाठी १०० बसेस मंजूर केल्या असून त्यातील ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. मेजर ध्यानचंद स्टेडियमवर साडे पाच कोटी खर्चुन टर्फ तयार केले आहे. महालक्ष्मी मंदिराभोवती १२० आकर्षक विद्युत खांब बसवले, पंचगंगा घाटावर रोषणाई केल्याने कोल्हापूरच्या वैभवात अधिक भर पडली आहे. पालिकेतील ४ हजार कर्मचाऱ्यांचा आकृतीबंधला आपण मंजुरी दिली, केएमटी कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी देऊन सातवा वेतन आयोग लागू केला असून प्रलंबित प्रश्नही मार्गी लावण्यात येतील अशी ग्वाही यावेळी दिली.
कोल्हापुरातील पूर नियंत्रणासाठी मित्राच्या माध्यमातून ३२०० कोटींचा प्रकल्प तयार झाला आहे. ३०० कोटींच्या कन्व्हेंशन सेंटरचे काम सुरू आहे. कोल्हापूरच्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी रिंग रोड करण्याचा आमचा प्रयत्न आहे. कोल्हापूर चित्रनगरी आद्ययावत करतोय. फाईव्ह स्टार हॉटेल आय टी कंपनी सुरू करण्यात येणार आहे. कोल्हापूर नवीन प्रशासकीय इमारत, ‘अमृत २’ योजनेचे पैसे असो, कोल्हापूरचे एकही काम पैशांअभावी थांबू देणार नाही अशी ग्वाही देखील याप्रसंगी दिली.
यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, खासदार धनंजय महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, माजी खासदार संजय मंडलिक, जयश्री जाधव, अमल महाडिक आणि शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच कोल्हापूरकर नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
