रेडू’ला राज्य पुरस्कारासह दादासाहेब फाळके महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान

 
गेल्या काही महिन्यात बरेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मानसन्मान मिळवलेल्या ‘रेडू’ या चित्रपटानं महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला डबल धमाका केला. राज्य पुरस्कारासह दिल्लीतल्या दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवातही ‘रेडू’ सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. राज्य पुरस्कारांमध्ये सहा वैयक्तिक पुरस्कारही पटकावत आपला दबदबा निर्माण केला. राज्य पुरस्कारांमध्ये रेडूनं विविध विभागांमध्ये नऊ नामांकनं मिळवली होती. तर, श्रीकांत देसाई यांना सर्वोत्कृष्ट रंगभूषेचा पुरस्कार आधीच जाहीर झाला होता. महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईत झालेल्या सोहळ्यात ‘रेडू’ला सर्वोत्कृष्ट चित्रपट या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. सोबतच सागर वंजारी यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, विजय नारायण गवंडे यांना सर्वोत्कृष्ट संगीत, संजय नवगिरे यांना सर्वोत्कृष्ट पटकथा, अजय गोगावले यांना सर्वोत्कृष्ट गायक आणि शशांक शेंडे यांना सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याशिवाय दिल्लीत झालेल्या दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवातही ‘रेडू’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान प्राप्त झाला. त्यामुळे एकाच दिवशी, दोन प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळण्याचा दुर्मिळ योग जुळून आला. या पूर्वी कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, कैरो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, चेन्नई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, एशियन चित्रपट महोत्सव, औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आदी चित्रपट महोत्सवांमध्ये हा चित्रपट दाखवला गेला आहे. तसंच प्रतिष्ठेचा अरविंदन पुरस्कार सागर वंजारी यांना मिळाला आहे. राज्य पुरस्कार आणि दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवात मिळालेल्या पुरस्काराविषयी दिग्दर्शक सागर वंजारी म्हणाले, ‘पहिल्याच चित्रपटाला एवढे मान-सन्मान मिळण्याचा आनंद शब्दांत सांगता येण्यासारखा नाही. एक साधी गोष्ट प्रामाणिकपणे सांगण्याचा प्रयत्न आम्ही रेडू या चित्रपटाद्वारे केला आहे. ‘रेडू’चं वैशिष्ट्य म्हणजे हा मालवणी बोलीतला चित्रपट आहे. चिन्मय पाटणकरनं उत्तमरित्या चित्रपटाचं मालवणी रुपांतर केलं आहे. मालवणी बोलमुळेच चित्रपट रंजक आणि खुमासदार झाला आहे. या निमित्तानं पहिला मालवणी चित्रपट प्रेक्षकांपुढे येत आहे. या चित्रपटाला पुरस्कारांच्या रुपानं राजाश्रय मिळाला आहे. आता प्रेक्षक कशा पद्धतीनं या चित्रपटाला स्वीकारतात याची उत्सुकता आहे.’
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये रेडू दाखवला जाण्याबरोबरच राज्य पुरस्कार मिळणं ही खूपच आनंदाची बाब आहे. कारण, आपल्या माणसांकडून मिळणार प्रेम जास्त मोलाचं असतं,’ अशी भावना निर्माता नवल किशोर सारडा यांनी व्यक्त केली. 
नवल फिल्म्सनं ब्लिंक मोशन पिक्चर्सच्या सहाय्यानं ”रेडू’ची निर्मिती केली आहे. लँडमार्क फिल्म्सच्या विधी कासलीवाल यांनी प्रस्तुत केलेला ‘रेडू’ १८ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!