
कोल्हापूर:
अपघातामुळं ब्रेनडेड झालेल्या अमर पाटील यांच्या अवयवदानामुळं कोल्हापूर-पुणे-मुंबई शहरातील चार रुग्णांना जीवदान मिळालं. मात्र त्यांच्या अवयव दानाचा निर्णय मोठ्या धाडसानं घेणार्या अमर यांच्या पत्नी शितल आणि त्यांच्या कुटूंबाच्या पदरी प्रशंसेशिवाय आणि कौतुकाशिवाय काहीच पडणार नाही. ही बाब लक्षात घेवून आमदार अमल महाडिक यांनी, आज अमरच्या कुटूंबियाची भेट घेतली आणि त्यांच्या मुलांच्या नावे १ लाख रूपयांची ठेव पावती ठेवली. तसंच खर्चासाठी श्रीमती शितल पाटील यांच्याकडं ५० हजार रूपये दिले. आणि या कुटूंबाच्या उदरनिर्वाहाला हातभार लागावा, यासाठी गावातीलच दुकानदाराकडून सुमारे २ वर्षे पुरेल, इतक्या अन्नधान्याची व्यवस्था करून आमदार महाडिक यांनी संवेदनशिलतेचा प्रत्यय आणून दिलाय.

रक्तदान, नेत्रदान पाठोपाठ शासनानं अवयवदानाची संकल्पना पुढे आणली आहे. रस्ते अपघाताबरोबरच अऩ्य कारणांमुळं अकाली मृत्यू होणार्या वाहनाधारकांची संख्या गेल्या काही वर्षांपासून वाढली आहे. रस्ते अपघातामध्ये बळी पडणार्यांमध्ये तरुणांची संख्या अधिक असते. ब्रेनडेड होण्याचं प्रमाणसुद्धा तितकंच लक्षणीय आहे. आणि अशा व्यक्तींच्या अवयवदानातून अऩ्य गरजू रुग्णांना जीवदान देण्याची कल्पना अवयवदान चळवळीतून पुढं आली आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय क्षेत्रातून जनजागृती होत आहे. समाजानंसुद्धा हा सकारात्मक बदल हळूहळू स्वीकारला आहे. करवीर तालुक्यातील निगवे दुमाला इथला मूळचा रहिवासी असणार्या कुटुंबवत्सल अमर पांडुरंग पाटील हा युवक येवती फाटा इथं ३० एप्रिल रोजी टेम्पोनं धडक दिल्यामुळं गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर सुरवातीला सीपीआर रुग्णालयात औषधोपचार सुरु होते. चार दिवसांच्या औषधोपचारानंतर कुटुंबियांनी अमरला ऍस्टर आधार हॉस्पिटलमध्ये हलवलं. पण त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळं त्याचा ब्रेन डेड झाला होता. यामुळं पाटील कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. प्रतिकूल परिस्थितीत पाटील कुटुंबियांची वाटचाल सुरु होती. उदरनिर्वाहासाठी अमर हा स्प्रे पेंटिंगचा व्यवसाय करत होता. अमर हा समाजातील सुख-दुःखाशी एकरुप असल्यानं त्याला अवयव दानाचं महत्व माहित होतं. त्यामुळं आपल्या कुटुंबियांकडं त्यानं अवयवदानाची इच्छा व्यक्त करुन ठेवली होती. त्याच्या इच्छेनुसार अमरची पत्नी शीतलनं दुःख पचवत अमरच्या अवयवदानाला मान्यता दिली. अमरचं हृदय, दोन्ही किडन्या आणि लिव्हर हे सुस्थितीत असल्यामुळं ते अवयव दान करण्याचा निर्णय झाला. अमरची पत्नी शीतलच्या धीरोदात्तपणाचं वर्णन करण्यात शब्द अपुरे पडतात. पतीविरहाचं दुःख क्षणभर बाजूला ठेवून तिनं हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आणि चौघां गरजू रुग्णांना अमरच्या अवयवदानातून एकप्रकारे पुनर्जन्मच मिळवून दिला. मात्र असा निर्णय घेणार्या शितल आणि तिच्या दोन मुलांच्या भवितव्याचं काय, असा प्रश्न उपस्थित होत होता. आमदार अमल महाडिक यांनी, या कुटूंबाच्या भवितव्यासाठी आपल्या परिनं हातभार लावण्याचं ठरवलं आणि आज सकाळी आमदार महाडिक यांनी, निगवे दुमाला इथं जावून अमरच्या कुटूंबियाची भेट घेवून त्यांचं सांत्वन केलं. आपण सदैव या कुटूंबियाच्या पाठीशी आहोत, असा विश्वास देवून आमदार महाडिक यांनी, अमर यांच्या मुलांच्या भवितव्यासाठी १ लाख रूपयांची ठेव पावती दिली. श्रीमती शितल यांना खर्चासाठी ५० हजार रूपये दिले आणि गावातीलच दुकानदाराला सांगून दोन वर्षेे पुरेल इतक्या अन्नधान्याची व्यवस्थाही आमदार महाडिक यांनी केलीय.१९ मे रोजी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे पाटील कुटूंबियांची भेट घेणार आहेत. तसंच श्रीमती शितल पाटील आणि कुटूंबाला आधार देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनुकूल असल्याचं आमदार महाडिक यांनी यावेळी सांगितलं. केवळ कौतुकाचे चार शब्द सांगण्यापेक्षा अमर यांच्या कुटूंबियांसाठी केलेली कृतीशिल मदत संवेदनशिलतेचा प्रत्यय आणून देणारी आहे, अशा शब्दात श्रीमती शितल पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी पाटील कुटूंबिय, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
Leave a Reply