
कोल्हापूर : पंचगंगा नदीवरील पर्यायी पुलाचा प्रश्न दोन आठवड्यात मार्गी लागेल, अशी ग्वाही काल जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिली आहे. या दिलेल्या प्रमाणे पंधरा दिवसात पर्यायी पुलाचे काम सुरु न झाल्यास दि. २८ मे २०१८ रोजी शिवाजी पूल येथे शिवसेनेच्या वतीने तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिला आहे. पर्यायी पुलाच्या कामाबाबत आमदार राजेश क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांची आज जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेतली. या कामामध्ये येणाऱ्या अडचणींबाबत आमदार राजेश क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याशी चर्चा केली.
यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, शिवाजी पुलाला पर्यायी पूल म्हणून बांधण्यात येत असलेल्या पुलाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून पुरातत्व विभागाच्या कायद्यामुळे थांबले आहे. या कायद्यात बदल करणारे विधेयक लोकसभेत मंजूर झाले आहे. मात्र, राज्यसभेत अद्याप मंजूर झाले नसल्याने पुलाच्या बांधकामांबाबत निर्णय होत नाही. या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत या पुलाचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी कोल्हापूर शहराचा लोकप्रतिनिधी या नात्याने दि. ३० जानेवारी २०१८ रोजीच्या पत्राद्वारे जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. परंतु, सुमारे साडेतीन महिन्यांचा कालावधी लोटला तरी प्रशासन गप्प आहे. जानेवारी महिन्यात जुन्या पुलावरून प्रवासी बस कोसळून अत्यंत दुर्दैवी घटना घडली होती. पण, या घटनेचे थोडेफार गांभीर्यही प्रशासनाने घेतलेले नाही. आजही या जुन्या पुलावर अपघात घडत आहेत. त्यामुळे प्रशासन पुन्हा मोठी दुर्घटना घडून निष्पाप बळी जाण्याची वाट बघत आहे का? असा सवालही आमदार राजेश क्षीरसागर यांनी उपस्थित केला. जिल्ह्याचे पालक या नात्याने जिल्हाधिकारी यांच्याकडे असणाऱ्या अधिकाराचा वापर करून हे काम तातडीने सुरु होणे गरजेचे आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या ग्वाही प्रमाणे येत्या पंधरा दिवसात पर्यायी पुलाचे काम मार्गी लावावे, अन्यथा दि. २८ मे २०१८ रोजी शिवसेना स्टाईलने शिवाजी पुलावर रास्ता रोको करून या प्रश्नाची गंभीरता प्रशासनाच्या निदर्शनास आणून देऊ, असा ईशाराही आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिला.
यावर जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी, केंद्रीय पुरातत्व विभागाकडेही याबाबत पत्रव्यवहार सुरु असून यापूर्वी दिलेल्या पत्रात दुरुस्ती करून बुधवारी नव्याने या विभागाला पत्र दिल्याचे सांगत, पुरातत्व विभागाला पुलाच्या बांधकामासाठी १५ दिवसांत एनओसी द्यावी अन्यथा परवानगी आहे, असे समजून काम सुरु करू, असे सुधारित पत्र दिल्याचे सांगितले. पर्यायी पुलाच्या प्रश्नाचे गांभीर्य मोठे असून पुरातत्व विभागाकडून पुलाच्या बांधकामाला कोणतीही अडचण येईल असे वाटत नसल्याचे सांगितले. यासह प्रशासन येत्या दोन आठवड्यात या पर्यायी पुलाचा प्रश्न मार्गी काढेल, अशी ग्वाहीही दिली.
Leave a Reply