
कोल्हापूर:
लोककल्याणकारी हिंदु राष्ट्र स्थापनेच्या उद्देशाने २ ते १२ जून २०१८ या कालावधीत गोवा येथे सप्तम् ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशन’ होणार आहे. हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या या अधिवेशनाच्या अंतर्गत विविध कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. यांत २ आणि ३ जूनला धर्मप्रेमी अधिवक्ता अधिवेशन, ४ ते ७ जून या कालावधीत अखिल भारतीय हिंदू अधिवेशन, ८ जून या दिवशी साधनावृद्धी शिबीर, तर ९ ते १२ जून या कालावधीत ‘हिंदु राष्ट्र संघटक अधिवेशन’ घेण्यात येणार आहे.

वर्ष २०१२ पासून आजपर्यंत झालेल्या सहा अधिवेशनांना प्रत्येक वर्षी मिळणारा प्रतिसाद वाढत जाऊन षष्ठ (सहाव्या) हिंदू अधिवेशनाला २२ राज्यांतील एकूण १३२ हिंदु संघटनांचे ३४२ हून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते. या अधिवेशनांचे वैशिष्ट्य म्हणजे भारताशिवाय नेपाळ, श्रीलंका, मलेशिया, बांगलादेश येथूनही हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी यात सहभागी झाले होते. सप्तम् ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’साठी प्रति वर्षीप्रमाणे हिंदु संघटनांच्या प्रतिनिधींचा वाढता प्रतिसाद लाभत आहे.
यापूर्वीच्या सहाही अधिवेशनांत निश्चित झालेल्या समान कृती कार्यक्रमाला ठळक यशस्विता लाभली. अखिल भारतीय हिंदू अधिवेशनांतून प्रेरणा घेऊन भारतातील अनेक राज्यांत आतापर्यंत एकूण ८२ प्रांतीय अधिवेशनांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. हिंदु धर्म आणि धर्मीय यांच्या रक्षणासाठी कार्यान्वित हिंदु विधीज्ञ परिषदेच्या हिंदूहिताच्या भरीव कार्यास यश मिळाले. प्रतिमास राष्ट्र आणि धर्म यांवर होत असलेल्या आघातांच्या विरोधात देशातील १० राज्यांमध्ये ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलनां’द्वारे व्यापक जागृती झाली. यामध्ये धार (मध्यप्रदेश) येेथे ‘भोजशाळा मुक्ती आंदोलन’ आणि ‘तिरुपति पवित्रता-रक्षा आंदोलन’ यांचे राष्ट्रीयकरण झाले. बांगलादेशात होत असलेल्या गोतस्करीच्या विरोधात बंगालच्या सीमावर्ती क्षेत्रांमध्ये हिंदुत्वनिष्ठांकडून संघटित प्रयत्न झाले. उत्तराखंडच्या पूरग्रस्तांना तसेच नेपाळच्या भूकंप पीडितांना आपत्कालीन साहाय्य करण्यात आले. विस्थापित काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनासाठी ‘एक भारत अभियान – कश्मीर की ओर’ या मोहिमेअंतर्गत भारतातील अनेक राज्यांत जाहीर धर्मजागृती सभांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. भारतभरात क्रियाशील असलेल्या प्रमुख हिंदु संघटनांच्या नेत्यांच्या त्रैमासिक बैठकांचे आयोजन करण्यात आले.
हिंदु संघटना आणि संप्रदाय यांनी राष्ट्रहित अन् धर्महित यांसाठी योगदान देणे, तसेच भारत हे हिंदु राष्ट्र म्हणून उद्घोषित करणे या सूत्रांच्या अनुषंगाने विविध विषयांवर सखोल चर्चा करणे, समान कृती कार्यक्रम ठरवणे आणि हिंदुहिताचे ठराव संमत करणे, हे सप्तम् अधिवेशनाचे स्वरूप असणार आहे.
Leave a Reply