
कोल्हापूर: एखादी घटना घडली किंवा गुन्हा घडला तर त्याने तो गुन्हा कसा केला याची संपूर्ण उकल प्रसार माध्यमातून दाखवली जाते. यामुळेच अन्य गुन्हेगारीच्या मार्गावर असणाऱ्यांना त्याची प्रेरणा मिळते. त्यांच्यासाठी एक व्यासपीठ ठरेल असे काही शिक्षण प्रसारमाध्यमाच्या बातम्यातून गुन्हेगारांना मिळते. यामुळे समाजाचे हित तर होतच नाही उलट नुकसान होते. तसेच मीडिया ट्रायलमुळे गुन्हेगार व आरोपी यातील फरक नष्ट होतो हे न्यायव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप केल्यासारखे होते. म्हणूनच सनसनाटीच्या नादात पत्रकारितेला धक्का बसत आहे पत्रकारांनी याचे भान ठेवले पाहिजे, प्रसारमाध्यमांनीही जबाबदारीची भूमिका घेणे गरजेचे आहे अशी अपेक्षा एड.अमित महाडेश्वर यांनी व्यक्त केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व विश्व संवाद केंद्राच्यावतीने देवर्षी नारद जयंती कार्यक्रमात ते बोलत होते देवर्षी नारद जयंतीचा कार्यक्रम म्हणजे पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्व पत्रकारांच्या सन्मानाचा दिवस असतो. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ‘पत्रकार आणि भारतातील अस्तित्वातील कायदे’ या विषयावर त्यांनी पत्रकारांना मार्गदर्शन केले.यामध्ये बोलताना ते म्हणाले की, पत्रकारितेशी संबंधित असे ७३ कायदे आहेत. माध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ असे भारतात मानले जाते. राज्यघटना अस्तित्वात येण्यापूर्वी व आल्यानंतर असे वर्गीकरण केल्यास मानवाच्या कल्याणासाठी कायद्याचे अस्तित्व निर्माण झाले.पूर्वी एखादी बातमी पोहोचवण्यासाठी इतिहासात दवंडी पिटली जायची.ब्रिटिश काळ हा पत्रकारितेतील महत्त्वाचा काळ समजला जातो. ब्रिटिशांविरुद्ध आवाज उठवला तर तो दाबण्यासाठी ब्रिटिशांनी कायदे केले. आणि भारताला स्वातंत्र्य मिळणे यात माध्यमांची भूमिका जास्त महत्वाची ठरली आहे. कलम १९ द्वारे व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला मिळाले. पण एखादी बातमी प्रसिद्ध करताना त्यामुळे समाजाचे नुकसान तर होत नाही हे पडताळणे गरजेचे असते. म्हणूनच सनसनाटी बातमी देणे या नादात आपण पत्रकारितेला धक्का पोहोचवत आहोत अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली. एशियन ब्रॉडकास्टिंग असोसिएशनच्या ठरावानुसार एखादी बातमी प्रसिद्ध करताना काही मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. तटस्थपणे, समाजाचे कल्याण होणारी, हितकारक येणाऱ्या पिढीला मार्गदर्शक, चांगले नागरिक बनण्यासाठी आवश्यक अशा गोष्टी या बातमीत असणे गरजेचे आहे. म्हणूनच पत्रकारांनी व माध्यमांनी कायद्याचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. याला कोणी अपवाद असू शकत नाहीत असेही ते म्हणाले. यावेळी सदस्य मुकुंद भावे, विवेक मंद्रुपकर,डॉ. सदानंद राजवर्धन, शिरीष हुपरीकर, चिन्मय काळे, अनिरुद्ध कोल्हापुरे उपस्थित होते.
Leave a Reply