
कोल्हापूर : नेहमीच नाविण्याच्या शोधात असणार्या आपल्या कोल्हापूरमध्ये संपन्न होत आहे, एक अभुतपूर्व ऐतिहासिक सोहळा शिवछत्र कला महोत्सव! हा महोत्सव येत्या २४ ते २८ मे असा पाच दिवस चालणार आहे अशी महिती साईप्रसाद बेकनाळकर व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. हा शिवछत्र कला महोत्सव! महाराष्ट्राचे महसूल मंत्री मा.चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष मा.महेश बा. जाधव यांच्या नेतृत्वाखाली होत आहे असे साईप्रसाद बेकनाळकर यांनी सांगितले.
आपल्या राजांची, छत्रपती शिवाजी महाराजांची ५१ फुटी भव्य प्रतिकृती या सोहळयासाठी साकारली जात असून, शिवाजी स्टेडियम, कोल्हापूर येथे दि. २४ ते २८ मे २०१८ या दरम्यान हा महोत्सव होणार आहे. दि.२४ मे रोजी उद्घाटन महाराष्ट्राचे महसूल मंत्री मा.चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या हस्ते होणार आहे.या
प्रसंगी सर्वच क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत असे महेश जाधव यांनी सांगितले.
५०० युवक-युवती मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके यावेळी सादर करणार आहेत. तर ५१ फुटी शिवशिल्पास कोल्हापूरातील जिजाऊ ढोल-ताशा पथक मानवंदना देणार आहे.
या ५ दिवसांमध्ये प्रा.नितिन बानुगडे पाटील, डॉ.शिवरतन शेटे, डॉ.अमर अडके, डॉ.दयानंद देवमोरे व अजय मस्के अशा दिग्गजांची व्याख्याने शिवप्रेमींना ऐकायला मिळणार आहेत. नृत्य, गायन, वाद्यवृंद, अभिनय, वक्तृत्व, फॅन्सीड्रेस, चित्रकला, रॉकबँड अशा विविध स्पर्धांमधुन कलाकारांसाठी एक भव्य व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तसेच महिलांसाठी उखाणे स्पर्धा, पाककला स्पर्धा, मेकअप व हेअरस्टाईल अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवामध्ये २४ रोजी गंध मराठी मातीचा मराठमोळे संगीत नाट्य,२६ रोजी मुद्रा भद्राय राजते हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित पोवाडा नाट्य होणार आहे तर २८ रोजी येथे ओशाळला मृत्यू हे छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असणारे नाट्य होणार आहे. सोबत शॉर्ट फिल्म फेस्टीवलमधून अनेक युवा फिल्ममेकर्स आपली चुणूक दाखविणार आहेत, महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील प्रतिभावंतांचा या सोहळयामध्ये पुरस्कार देवून सन्मान केला जाणार आहे.
या महोत्सवामध्ये सर्व शिवप्रेमींना शिवकालीन शस्त्रप्रदर्शन, ऐतिहासिक चित्र व शिल्प प्रदर्शन अशा विविध ऐतिहासिक गोष्टी पहायला मिळणार आहेत. कोल्हापूरातील उद्योजकांसाठी फुड व इतर स्टॉल्समधुन प्रसिध्दी व विक्रीसाठी खात्रीशीर दालन या ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
या महोत्सवाची जय्यत तयारी सुरु असुन शिवप्रेमींचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. छ.शिवाजी महाराव व छ.शाहु महाराज यांचा वारसा लाभलेल्या आपल्या कोल्हापूरमध्ये होणारा हा महोत्सव म्हणजे कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरणार असे उद्गार मान.महेश जाधव यांनी पत्रकार परिषद काढले. प्रत्येक कोल्हापूरकराने या महोत्सवामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. शिवाय प्रसिद्धीसाठी चित्ररथ सध्या शहरात फिरत आहे असे जाधव यांनी सांगितले.
सदर महोत्सवाचे संयोजक आय एम एंटरटेनरचे संस्थापक साईप्रसाद बेकनाळकर यांनी सदर महोत्सवाबद्दल विस्तृत माहिती दिली पत्रकार परिषदेवेळी शिवछत्र कला महोत्सव समितीचे उमेश पाटील, मोहन माने, सुचित हिरेमठ, तेजश्री पार्टे, बीना देशमुख इत्यादी सर्वजण उपस्थित होते.
Leave a Reply