काही दिग्दर्शकांचा एका विशिष्ट पद्धतीचे सिनेमा बनविण्यात हातखंडा असतो. त्यामुळेच अशा दिग्दर्शकांच्या चित्रपटांची प्रेक्षकही आतुरतेने वाट पाहात असतात. ‘कॅनव्हास’ या सिनेमाद्वारे दिग्दर्शनाकडे वळल्यानंतर पदार्पणातच कौतुकास पात्र ठरलेला दिग्दर्शक शिवदर्शन म्हणजेच शिबू साबळे आता ‘लगी तो छगी’ हा कॉमेडी-सस्पेन्स-थ्रीलरपठडीत मोडणारा सिनेमा घेऊन आला आहे.शिवदर्शन साबळे यांनी दिप्ती विचारे, स्वाती फडतरे आणि अजित पाटील यांच्या साथीने ‘लगी तो छगी’ या आगामी मराठी सिनेमाची निर्मिती केली आहे. पद्मश्री शाहिर साबळे यांची परंपरा सुरू ठेवणा-या शिवदर्शनचा हा तिसरा मराठी सिनेमा आहे. साबळे कुटुंबियांचा ‘महाराष्ट्राची लोकधारा’ पासून आतापर्यंतचा प्रवास प्रेक्षकांना मोहिनी घालणारा आहे. त्यामुळेच हा सिनेमा प्रेक्षकांसाठी संगीतमय पर्वणीच ठरणार आहे. शाहिर साबळेचे चिरंजीव आणि शिबूचे वडील देवदत्त साबळे यांनी संगीतकार अनुराग गोडबोलेंच्या साथीने या सिनेमासाठी संगीत दिलं आहे. “ही चाल तुरू तुरू…” या गाण्याने अखंड महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या देवदत्त साबळे यांनी 40 वर्षांपूर्वा लिहिलेलं तसंच संगीतबद्ध केलेलं एक गीत या सिनेमात ऐकायला मिळणार आहे. शिवदर्शनने बंधू हेमराजच्या साथीने या चित्रपटाचं लेखन केलं आहे.या सिनेमाची कथा अडचणीत सापडलेल्या आजच्या युगातील एका तरूणाभोवती गुंफण्यात आली आहे. अभिनेता अभिजीत साटमने ही भूमिका साकारली आहे. शिबूला कायम वेगळया वाटेने जाणाऱ्या पटकथांनी आकर्षित केलं आहे. सिनेमाच्या माध्यमातून केवळ मनोरंजन न करता कायम त्याद्वारे काहीतरी सांगण्याचा प्रयत्न त्याने केला आहे. ‘लगी तो छगी’ हा सिनेमासुद्धा त्याच प्रकारचा असल्याचं सांगत शिबू म्हणाला की, हा कॉमेडी-सस्पेन्स-थ्रीलर आहे. थ्रील हे सिनेमाचं अविभाज्य अंग आहे. सिनेमा कोणत्याही प्रकारचा असला तरी पटकथेत थ्रील असणं गरजेचं असतं. या सिनेमाची कथा तशाच प्रकारची असल्याने रसिकांना शेवटच्या क्षणापर्यंत खुर्चाला खिळवून ठेवण्यात यशस्वी होईल असंही शिबू मानतो.या सिनेमात अभिजीत सोबत निकीता गिरीधर, रविंदर सिंग बक्षी, मिलिंद उके, योगेश सोमण, असित रेडीज,शैला काणेकर, राजू बावडेकर, सागर आठलेकर, महेश सुभेदार, अक्षय भोसले आणि सुरेंदर पाल आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत. देवदत्त यांच्या एका गीतासोबतच मंगेश कांगणे यांनी लिहिलेल्या एका अनोख्या ढंगातील गीताचा समावेशही या सिनेमात करण्यात आला आहे. राष्ट्रीय पारितोषिक विजेते कॉस्च्युम डिझाइनर सचिन लोव्हलेकर यांनी कॉस्च्युम डिझायनिंगची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली असून संकलनाचं काम अपूर्वा मोतीवाले-सहाय आणि आशिष म्हात्रे यांनी पाहिलं आहे. शीर्षकापासूनच उत्कंठा वाढविणारा हा सिनेमा पडद्यावरही तितकाच सुरेख दिसावा यासाठी कॅमेरामन प्रदिप खानविलकर यांनी खूप मेहनत घेऊन वेगवेगळया अँगलमधून या सिनेमाचं छायांकन केलं आहे. गोवा, पुणे तसेच मुंबईतील विविध लोकेशन्सवर या सिनेमाचे चित्रीकरण करण्यात आले आहे.
Leave a Reply