
सांगली : जागतिक कीर्तीचे उद्योगपती आणि दुबईस्थित ‘अल अदील’ समूहाचे व्यवस्थापकीय संचालक ‘मसालाकिंग’ डॉ. धनंजय दातार येत्या गुरुवारी (२४ मे २०१८) सांगलीमध्ये येत आहेत. ‘रोटरी क्लब ऑफ सांगली’तर्फे आयोजित ‘बातचीत एका मसाला किंगशी’ या कार्यक्रमातून डॉ. दातार आपली यशोगाथा उपस्थितांपुढे उलगडणार आहेत. सांगलीच्या गणेशनगरमधील रोटरी हॉलमध्ये सायंकाळी सव्वासातला होणाऱ्या या कार्यक्रमात लेखिका सौ. श्वेता गानू या डॉ. दातार यांची प्रकट मुलाखत घेणार असून नंतर प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम होणार आहे. जीवनाच्या संघर्षपूर्ण प्रवासातून अनेक अडथळे पार करत व्यवसायात गरूडभरारी घेणाऱ्या डॉ. दातारांशी संवाद साधण्याची संधी नवउद्योजकांना, तसेच सांगलीकरांना मिळणार असल्याने या व्याख्यानाविषयी मोठी उत्सुकता आहे.जिद्द, अफाट मेहनत आणि कर्तृत्वाच्या जोरावर महाराष्ट्रात अनेक उद्योजक घडले आहेत. यातील काही मोजक्या उद्योजकांनी भारतातच नव्हे, तर जगातही आपल्या उद्योगाचे साम्राज्य निर्माण केले आहे. दुबईतील सुप्रसिद्ध ‘अल अदील’ समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असलेल्या डॉ. दातार यांनी गेल्या ३४ वर्षांत आपल्या व्यवसायाचा आखाती देशांत प्रचंड जम बसवला. दुबईमध्ये एका छोट्याशा दुकानापासून व्यवसायास सुरुवात करणाऱ्या दातार यांनी आखाती देशांत ३९ सुपर मार्केट्सची स्वत:ची रीटेल आऊटलेट्सची साखळी निर्माण केली. त्याचबरोबर पिठाच्या दोन गिरण्या आणि मसाल्याचे दोन कारखानेही उभारले. धनंजय दातार यांची ‘अल अदिल ट्रेडिंग’ कंपनी आखाती देशांतील स्थानिक व भारतीयांच्या घराघरांत पोचली आहे.डॉ. धनंजय दातार यांची यशोगाथा उद्योगाची आकांक्षा बाळगणाऱ्या तरुणांसाठी, तसेच नवउद्योजकांसाठी प्रेरणादायी आहे. गरीबीत बालपण गेलेल्या धनंजय यांनी जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर संघर्षाचा मुकाबला केला आहे. कोणताही उद्योजकीय वारसा अथवा आर्थिक पाठबळ नसताना त्यांनी तरुण वयात व्यवसायाचे स्वप्न बघितले. मुंबईत फिनेल व इन्स्टंट मिक्सेस विक्रीचा व्यवसाय करताना विक्रीकला व ग्राहकसेवा कौशल्य आत्मसात केले. वडिलांनी दुबईत सुरु केलेल्या छोट्याशा दुकानात झाडू-पोछा, लादी सफाई, ५० किलोंची पोती पाठीवर वाहून नेणे अशा कामांतून कारकीर्दीची सुरवात केली. आई-वडिलांच्या संस्काराची शिदोरी आणि कष्टाळू वृत्ती या जोरावर त्यांनी एका छोट्याशा व्यवसायाचे रुपांतर बहुराष्ट्रीय उद्योग समूहात करुन दाखवले. त्यामुळे दुबईच्या शासकांनी धनंजय दातार यांना ‘मसालाकिंग’ बहुमानाने संबोधून त्यांच्या परिश्रम आणि कर्तृत्वाचा यथोचित गौरव केला आहे.व्यवसाय लहान आहे, की मोठा, असा विचार न करता वक्तशीरपणा, प्रामाणिकपणा आणि परिणामकारक सेवा या त्रिसूत्रीच्या जोरावर ग्राहकांचे समाधान केल्यास नक्कीच यश मिळते, यावर डॉ. दातारांचा भर आहे. प्रचंड मेहनत आणि प्रामाणिकपणा याशिवाय स्वप्ने पूर्ण होत नाहीत, असा सल्ला ते नेहमीच तरुणांना देतात. हाच प्रामाणिकपणा दातार यांनी मागील ३४ वर्षे आपल्या व्यवसायात कायम ठेवला. यामुळे त्यांना भारताबरोबरच जागतिक स्तरावरही अनेक प्रतिष्ठित पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.‘फोर्ब्स मिडल ईस्ट’तर्फे नुकताच ‘टॉप इंडियन लीडर्स इन द अरब वर्ल्ड २०१८ – रीटेल ॲवॉर्ड’ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. डॉ. दातार हे ‘फोर्ब्स मिडल ईस्ट’च्या आघाडीच्या १०० भारतीय नेत्यांच्या मानांकन यादीतील बहुधा एकमेव महाराष्ट्रीय आहेत. अरेबियन बिझनेस रँकमध्ये त्यांना १४ वे, तर फोर्ब्जच्या यादीमध्ये ३० वे मानांकन मिळाले आहे.डॉ. दातार यांनी विविध संस्थांना मदत करुन सामाजिक बांधीलकीही जपली आहे. भारतीय संस्कृतीचे आखाती देशांमध्ये संवर्धन करण्यात ते आघाडीवर आहेत. दुबईमध्ये मराठी उपक्रम राबवण्यास ते अधिकाधिक मदत करतात. त्यांना सामाजिक उद्योजकतेतील योगदानासाठी अलिकडेच मुंबईत मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
‘अल अदील ट्रेडिंग’ कंपनीने डॉ. धनंजय दातार यांच्या चैतन्यशील नेतृत्वाखाली ९००० भारतीय उत्पादने संयुक्त अरब अमिरातीत (युएई) आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असून स्वतःच्या ‘पिकॉक’ या ब्रँडअंतर्गत तयार पिठे, मसाले, लोणची, मुरंबे, नमकीन, इन्स्टंट अशा श्रेणींत ७०० हून अधिक उत्पादने ग्राहकांना उपलब्ध करुन दिली आहेत. मसाले व पिठे तयार करुन पॅकबंद करण्यासाठी डॉ. दातार यांनी दुबई इन्व्हेस्टमेंट पार्कमध्ये दीड लाख चौरस फुटांचा भव्य प्रकल्प उभारला आहे. त्यांच्या उद्योगाची भारतीय शाखा ‘मसाला किंग एक्स्पोर्ट्स’ या नावाने मुंबईत कार्यरत आहे. ‘अल अदील’ समूहाचे ३९ आऊटलेट्स, आधुनिक तंत्रज्ञानयुक्त २ पिठाच्या गिरण्या व २ मसाला कारखाने असे जाळे दुबई, अबू धाबी, शारजा व अजमान येथे विस्तारले असून मुंबई निर्यात विभागाची शाखा ‘मसाला किंग एक्स्पोर्ट्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड’ नावाने मुंबईत आहे. ‘अल अदील’ समूह सक्रिय विस्ताराच्या टप्प्यात असून त्याने नुकतीच दुबईसह ओमान, बहारीन व सौदी अरेबियामध्ये नवी आऊटलेट्स उघडली आहेत. कंपनीने अमेरिका, कॅनडा, टांझानिया, केनया, स्वित्झर्लंड, इटली व एरित्रिया, तसेच कुवेत, ओमान व संयुक्त अरब अमिरातीत विशेष व्यापारी मार्ग स्थापन करुन आयात व निर्यात क्षेत्रातही विस्तार साधला आहे.
Leave a Reply