

एकविसाव्या शतकातही आपण जाती-पातीचं राजकारण करतोय याची घृणा येत असल्याचं सांगत नागराज म्हणाले की, जातीला मी माझा खूप मोठा शत्रू मानतो. ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ हे नाटक छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांचे थोर विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करीत आहे. आजच्या पिढीला याच विचारांची खरी गरज आहे. या दोन थोर व्यक्तींनी कधीच जात-पात, धर्मभेद बाळगला नाही. त्यांची कामगिरी चुकीच्या पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचविण्याचं कार्य आजवर करण्यात आलं आहे. त्यामुळेच चांगले विचार देणारं चांगलं पुस्तक आणि वाईट विचार देणारं वाईट पुस्तक ही या नाटकात मांडलेली व्याख्या मला खूप भावली. हे नाटक पाहताना दोन वेळा माझ्या डोळे पाणावले. कारण या नाटकातील विचार थेट हृदयाला भिडणारे आहेत. या नाटकातील शिवाजी महाराजांच्या जिरेटोपाचं माप तुमच्या-आमच्या सर्वांच्या मेंदूशी जुळो ही सदिच्छा देत नागराज यांनी नाटकाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.भरत जाधव यांनीही ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’च्या संपूर्ण टिमचं तोंड भरून कौतुक केलं. प्रेक्षकांचा ‘टाइमपास’ करण्यासाठी आम्ही आहोतच, पण ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकातील कलाकार हेच आजचे खरे सुपरस्टार आहेत. त्यांना माझा सलाम… या नाटकाच्या लेखकांनाही सलाम आणि हे नाटक पाहणाऱ्या प्रेक्षकांनाही सलाम. कारण अशा प्रकारचं नाटक पाहण्यासाठी धाडस लागतं. मराठी प्रेक्षकांनी हे धाडस दाखवत या नाटकाला ७०० व्या प्रयोगापर्यंत आणलं आहे. यापुढेही हा प्रवास अविरतपणे सुरूच राहिल. या कलाकारांची मेहनत आणि शिवराय-भीमराय यांचे विचार जनमानसापर्यंत पोहोचवण्याची धडपड पाहून आपणही दोन महिन्यातून एक वेळ या नाटकासाठी वेळ देणार असल्याचं भरतने जाहिर केलं.
२०१२ मध्ये रंगभूमीवर अवतरलेलं ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ हे नाटक सारा एंटरटेन्मेंट, रंगमळा आणि विद्रोही शाहिरी जलसा यांची प्रस्तुती आहे. भगवान मेदनकर या नाटकाचे निर्माते आहेत. राजकुमार तांगडे यांनी लिहिलेल्या या नाटकाचं दिग्दर्शन नंदू माधव यांनी केलं आहे. कैलास वाघमारे, मीनाक्षी राठोड, संभाजी तांगडे, प्रवीण डाळींबकर, अश्विनी भालेकर, मधुकर बिडवे, राजू सावंत, श्रावणी तांगडे आदींच्या यात भूमिका आहेत. नाटकाची संकल्पना, गीत, संगीत शाहीर संभाजी भगत यांचं आहे.
Leave a Reply