
कोल्हापूर : कोल्हापूर शहरात महिलांसाठी 25 ठिकाणी शौचालये उभारणार असून यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शहरातील 25 जागा निश्चित केल्या आहेत. याच धर्तीवर राज्यात 250 ठिकाणी महिलांसाठी शौचालये उभारणार असल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्यावतीने श्री करवीर निवासीनी श्री महालक्ष्मी/ श्री अंबाबाई मंदिरात उभारण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य उपचार केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते झाले. याप्रसंगी आयोजित समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमास पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, कोषाध्यक्ष वैशाली क्षीरसागर,सदस्य प्रमोद पाटील, बी.एन. बसवगौडा पाटील, शिवाजी जाधव, संगिता खाडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा शल्यचिकित्स डॉ. एल.एस.पाटील, सचिव विजय पवार आदि मान्यवर उपस्थित होते.
संवेदना ट्रस्टच्या माध्यमातून यावर्षीच्या आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहरात महिलांसाठी 25 ठिकाणी शौचालये उभारण्यात येणार असून त्याचे व्यवस्थापन महिला बचतगटांना देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. गेल्या तीन वर्षात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले असून आतापर्यंत रद्दी, रोपे तसेच खत अशा स्वरूपात वाढदिवसाच्या शुभेच्छा स्विकारल्या आहेत. यंदाच्या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी शौचालये उभारण्यात येणार असून संवेदना ट्रस्टच्या माध्यमातून हा नाविण्यपूर्ण उपक्रम राबविला जाणार आहे.
आरोग्य केंद्र प्रोफेशनल पध्दतीने चालवून भाविकांना दर्जेदार आरोग्यसेवा द्या-पालकमंत्री
पश्चिम महारारष्ट्र देवस्थान समितीने या पुढील काळात समाजाची नेमकी गरज ओळखून सामाजिक उपक्रम हाती घ्यावेत असे आवाहन करून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्यावतीने श्री करवीर निवासीनी श्री अंबाबाई मंदिरात सुरू केलेल्या प्राथमिक आरोग्य उपचार केंद्रामुळे भाविकांना तात्काळ आरोग्यसेवा उपलब्ध होतील. भविष्यात समितीच्यावतीने अद्यावत हॉस्पिटल उभारण्याचा मानस आहे. या उपक्रमास आवश्यक ती मदत केली जाईल. मंदिरात सुरू केलेले आरोग्य केंद्र प्रोफेशनल पध्दतीने चालवा. चांगले डॉक्टर्स उपलब्ध करून भाविकांना चोवीस तास दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून द्या ,असे आवाहनही त्यांनी केले.
सैनिक/माजी सैनिकाविषयी प्रत्येकाने आदर जोपासणे गरजेचे असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, माजी सैनिकांच्या हिताचे विविध निर्णय राज्य शासनाने घेतले असून शहीद सैनिकांच्या कुटुंबियांना राज्य शासनामार्फत देण्यात येणारी 8 लाखाची मदत 25 लाख करण्यात आली आहे. तसेच सैनिकांच्या विधवांना पाच एकर जमिन देण्याबरोबरच माजी सैनिकांना पंतप्रधान आवास योजनेतून घर उपलब्ध करून देण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे. देवस्थान समितीने मंदिरातील सुरक्षा रक्षकांना पगारवाढ करण्याचा घेतलेला निर्णय महत्वाचा असून तो माजी सैनिक असलेल्या सुरक्षा रक्षकांसाठी उपयुक्त ठरणारा आहे.
सेवा हाच धर्म या हेतूने मंदिरामध्ये सुरू केलेल्या आरोग्य उपचार केंद्राच्या माध्यमातून मंदिर परिसरातच भाविकांना आरोग्याची दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार असल्याबद्दल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी समाधान व्यक्त केले. देवस्थान समितीच्यावतीने समाजाची गरज ओळखून विविध सामाजिक उपक्रम हाती घ्यावेत, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.
यावेळी आरोग्य जागृती प्रबोधन माहिती पत्रकाचे प्रकाशन पालकमंत्री पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी प्रास्ताविक करून देवस्थान समितीच्यावतीने सुरू केलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची माहिती दिली. ते म्हणाले यापुढील काळात देवस्थान समितीच्यावतीने ग्रंथालय/माहिती केंद्र उभारण्याचा मानस असून भक्त निवास, अन्नछत्र या उपक्रमाबरोबरच मंदिराला प्राचिन लुक देण्याचा समितीचा मानस असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी डॉ. संदिप पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर यांच्याहस्ते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे स्वागत करण्यात आले. अन्य मान्यवरांचे स्वागत समिती सदस्यांनी केले. कार्यक्रमास ॲड. संपतराव पवार, संदीप देसाई, बाबा इंदुरकर, मानवी विमेन्स वेलफेअर फौंडेशनचे संस्थापकअजितसिंह काटकर, तुषार देसाई, , सुभाष दामुगडे, नंदु मोरे, सुहास लटोरे, देवस्थान समितीचे व्यवस्थापक धनाजी जाधव, श्री. साळवी यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी, अधिकारी, डॉक्टर्स, भाविक आणि नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply