
कोल्हापूरच्या कृष्णराज महाडिकने रेसिंग या क्रीडा प्रकारात अत्यंत चांगली कामगिरी करत, आपला नावलौकीक सातासमुद्रापार पोहचविला आहे. इंग्लंड मधील अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्या, बी.आर.डी.सी. ब्रिटीश फॉर्म्युला थ्री स्पर्धेत कृष्णराजने गेल्यावर्षी प्रथम क्रमांक पटकावण्याची किमया साध्य केली. ब्रँडस् हॅच गॅ्रंड प्रिक्स रेसिंग ट्रॅकवर कृष्णराजने इतिहास घडविला. या कामगिरीमुळे रेसिंगच्या जगतामध्ये त्याचा दबदबा निर्माण झाला. यंदाचा बीआरडीसी ब्रिटीश फॉर्म्युला थ्री चा हंगाम सुरु झाला असून, इंग्लंडमध्ये मुख्य ८ फेर्या आणि प्रत्येक फेरीत ३ रेस अशा २४ रेसचा हंगाम होत आहे. गेल्या वर्षीच्या कामगिरीच्या जोरावर इंग्लंड मधील सुप्रसिद्ध डबल आर रेसिंग टिमने कृष्णराजला पूर्ण हंगामासाठी मुख्य रेसर म्हणून करारबद्ध केले आहे. अत्यंत चुरशीने होणार्या या फेर्यांकडे संपूर्ण रेसिंग जगताचं लक्ष लागून राहिले आहे. कृष्णराज महाडिकच्या रूपाने भारताचे आव्हान या हंगामात आहे. टिमची आणि चाहत्यांची अपेक्षा पूर्ण होईल, अशी कामगिरी करत कृष्णराजने रविवारी स्नेटरटन ग्रँडप्रिक्स टॅ्रकवर झालेल्या तिसर्या फेरीतील आठव्या रेस मध्ये उपविजेतेपद पटकावले. विजेते पदाला गवसणी घातलेल्या मॅन्युअल मालदोनादो याला जोरदार टक्कर देत, कृष्णराजने पोडियमवर स्थान मिळवले. शेवटच्या लॅप मध्ये तर कृष्णराज आणि मॅन्युअल यांच्या कारमध्ये केवळ अर्ध्या सेकंदाचा फरक होता. त्यांच्यातील या चुरशीमुळे चाहत्यांनाही श्वास रोखून धरावा लागला होता. रेस संपताच उपस्थितांनी दोघांच्या कौशल्याला मनमुराद दाद दिली. बक्षिस वितरणानंतर बोलताना मॅन्युअलनं कृष्णराजच्या कामगिरीचे कौतुक केले. अखेरच्या लॅपमध्ये कृष्णराजची कामगिरी उंचावली होती आणि पुढील रेस मध्ये त्याचं कडवे आव्हान उभे असेल याची जाणीव आहे, असे सांगत कृष्णराजच्या कामगिरीला दाद दिली.
डबल आर टिमचे प्रमुख ऍन्थनी बोयो हियात यांनी कृष्णराजच्या ड्रायव्हींग स्कीलबाबत प्रशंसा केली. कृष्णराजच्या रूपाने अत्यंत चांगला चालक बीआरडीसी ला मिळाला असल्याचे त्यांनी आवर्जुन नमुद केले. पूर्ण हंगामात कृष्णराजने दमदार कामगिरी केली आहे. विशेषत: आठव्या स्थानावरून सुरवात करून दुसरं स्थान पटकावण्यासाठी त्यानं दाखवलेले कौशल्य हे वाखाण्याजोगं आहे, असे नमुद केले. या विजयामुळे आपला आत्मविश्वास दुणावला असून, उर्वरीत हंगामात आणखी उज्वल कामगिरी करण्यासाठी त्याचा उपयोग होईल, अशी प्रतिक्रिया कृष्णराजनं व्यक्त केली. आजवर या हंगामात १३० गुण मिळवून तो सर्वसाधारण चॅम्पियनशिप मध्ये तो पाचव्या स्थानावर आहे. रविवारच्या विजयामुळे सर्वांच्याच नजरा कृष्णराजच्या पुढील कामगिरीकडे लागून राहिल्या आहेत. गेल्या वर्षी इंग्लंडमधील ब्रँडस् हॅच गॅ्रंड प्रिक्स रेसिंग ट्रॅकवर बी.आर.डी.सी. ब्रिटीश फॉर्म्युला थ्री रेसिंगमध्ये कृष्णराजने प्रथम क्रमांक अर्थात पोल पोझिशन पटकावून इतिहास घडवला होता. दरम्यान या हंगामासाठी तयारी करण्याच्या हेतूने कृष्णराज चार महिने इंग्लंडमध्ये वास्तव्यास आहे.
Leave a Reply