
कोल्हापूर: प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाअभावी गडिंगलज तालुक्यातील उचंगी प्रकल्पाचं काम रखडलं असून या विलंबामुळे प्रकल्पाच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे अशी कबुली जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी विधान परिषदेत दिली. आमदार सतेज पाटील यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.
आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत उचंगी प्रकल्पाबाबत प्रश्न उपस्थित केला उचंगी प्रकल्पात पाणी साठवण्याची घोषणा पालकमंत्र्यांनी करूनही सांडपाण्याच्या कामाला सुरूवात करण्यात आलेली नाही तसंच प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्नही मार्गी लागलेला नाही. 31 डिसेंबर 1999 साली सुरू झालेल्या या प्रकल्पाचे काम मागील अनेक वर्षापासून रखडल्याने 15 कोटींचा हा प्रकल्प शंभर कोटींवर गेला आहे या प्रकरणी शासनाने चौकशी करून प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत कोणती कार्यवाही केली असे प्रश्न आमदार पाटील यांनी विधान परिषदेत उपस्थित केले.या प्रश्नांना लेखी उत्तर देताना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सदर बाब खरी असल्याची कबुली दिली. प्रकल्पाची मंजूर प्रशासकीय मान्यता किंमत 15 कोटी 11 लाख रुपये असून अद्ययावत सुधारित प्रशासकीय मान्यता 58 कोटी 73 लाख रुपये इतकी आहे. पुनर्वसना अभावी प्रकल्पग्रस्त हे प्रकल्पाच्या कामात तीव्र विरोध करत असल्यामुळे प्रकल्पाचे काम रखडले आहे. या विलंबामुळे प्रकल्पाच्या किमतीत वाढ झाली आहे असे महाजन यांनी सांगितले. शासनाने 2015 रोजी प्रकल्पाच्या किमतीच्या सुधारित प्रस्तावास मान्यता दिल्याने चौकशी करण्याचा प्रश्न नसल्याचे त्यांनी सांगितले. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक 100 हेक्टर पर्यायी जमीन क्षेत्रापैकी 97 हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात आले असून त्यापैकी 64 चे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित क्षेत्र संपादन आणि वाटपाची कार्यवाही महसूल विभागाकडून प्रगतीपथावर असल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली.
Leave a Reply