ईशान –जान्हवीची थेट पुण्याला “धडक”

 
सैराट’ चित्रपटाचा रिमेक होणार ही बातमी समोर आल्यापासूनच धडक चित्रपटाबद्दलची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये लागून राहिली होती. त्यात ईशान खत्तर आणि जान्हवी कपूर ही जोडी यानिमित्ताने बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार ही अजून एक उत्सुकतेची बाब ठरत होती. येत्या 20 जुलै ला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचं प्रमोशन जोरदार सुरू असून आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनकरता ईशान – जान्हवी थेट पुण्याला पोहोचले होते. या पुणे भेटीदरम्यान आगा खान पॅलेसला या जोडीने भेट दिली.
दरम्यान यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत ईशानने पुण्याच्या वातावरणावर आपलं प्रेम जडलं असून हे शहर खूप सुंदर असल्याचं म्हटलं आहे. तर धडक चित्रपटाच्यानिमित्ताने पहिल्यांदाच झालेली पुणे भेट आनंदी करून गेल्याचं जान्हवीने स्पष्ट केलं आहे.
तर नुकतंच प्रदर्शित झालेल्या पहली बार या गाण्याबद्दल बोलताना ईशान म्हणाला, “हे गाणं अतिशय सुंदर झालं असून यातून चित्रपटाचा सार स्पष्ट होत आहे.”
पत्रकार परिषदेत मिडियाशी मराठीत संवाद साधणाऱ्या जान्हवीने चित्रपटातील आपल्या भूमिकेविषयी बोलताना, “खऱ्या आयुष्यात मी पार्थवीपेक्षा पूर्णपणे वेगळी असून या पात्राकडून मी बऱ्याचशा गोष्टी शिकले असल्याचं” तिने म्हटलं आहे.
पत्रकारपरिषदे व्यतिरिक्त पुणेकरांशी संवाद साधण्याच्या हेतूने ईशान – जान्हवी यांनी मॉललाही भेट दिली आणि प्रेक्षकांचं प्रेम अनुभवलं.
सध्या जोरदार प्रमोशन सुरू असणाऱ्या धडक चित्रपटाचं दिग्दर्शन शशांक खेतन यांनी केलं असून या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज् आणि धर्मा प्रोडक्शन्स यांनी केली आहे. हा चित्रपट येत्या 20 जुलै ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!