
कोल्हापूर: कोणत्याही लाभाची पर्वा न करता, शोषित-कष्टकरी आणि अन्यायग्रस्त जनतेच्या न्याय हक्कासाठी, प्रसंगी जीवावर बेतलेले आंदोलने संजय दिनकरराव पाटील यांनी यशस्वी करून दाखविली. याचबरोबर त्यांच्या दोन तपातील विविध आंदोलनांचा समग्र आढावा घेणारे, त्याच नावाचे पुस्तक हे तमाम रस्त्यावर लढणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान आहे, अशा शब्दात माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. केशवराव भोसले नाट्यगृहात सामाजिक कार्यकर्ते संजय दिनकरराव पाटील यांचा सुवर्णमहोत्सवी सत्कार आणि आंदोलन पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर सौ. शोभा बोंद्रे होत्या.
वडिलांच्या सामाजिक कार्याचा वसा आणि वारसा पुढे नेणारे संजय पाटील मला बंधूवत आहेत. संघर्षमय जीवन जगणारे संजय भविष्यात नक्कीच मोठ्या पदावर पोहचतील. प्रसंगी त्यांनी स्वपक्षीयांकाविरोधात आंदोलने करावीत. तो त्यांचा संवेदनशील कार्यकर्ता म्हणून हक्कच आहे, अशा शब्दात आमदार सतेज पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. महापौर सौ. शोभा बोंद्रे यांनी कोल्हापूरच्या परंपरेला साजेसा कार्यकर्त्यांना बळ देणारा सोहळा, अशा शब्दांत त्यांचा गौरव केला. आनंद माने यांनी शब्दपूर्ण, संदर्भ आणि कोणतीही तडजोड न करण्याची वृत्ती यामुळेच संजय पाटील यांची आंदोलने यशस्वी झाली, अशा शब्दांत गौरव केला. चंद्रकांत यादव, आदीनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.
दरम्यान, यावेळी संजय पाटील यांचा सपत्नीक आणि आंदोलनचे संपादन करणारे राजेंद्र मकोटे आणि बाबासाहेब खाडे यांचाही सत्कार करण्यात आला. सीमा मकोटे आणि सतीश बरगे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी डॉ. संदीप पाटील, शशी बिडकर यांच्यासह आंदोलनातील मुख्य ताकत असणारे कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply