मला क्रिएटिव्ह फ्रिडम लागतं: गश्मीर महाजनी

 

प्रेमा तुझा रंग कसा म्हणजे प्रेक्षकांशी संवाद साधण्याची उत्तम संधी अभिनेता गश्मीर महाजनी स्टार प्रवाहच्या प्रेमा तुझा रंग कसा या मालिकेतून छोट्या पडद्यावर येतोय. ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री दहा वाजता पहायला मिळणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने गश्मीरशी साधलेला संवाद…प्रेमा तुझा रंग कसा या नव्या मालिकेचा तू एक भाग आहेस. त्याविषयी काय सांगशील?

 रोज एक कथा निवडली जाईल आणि नाट्यमय पद्धतीनं दाखवली जाईल. आपल्याला नात्यांमध्ये खूप गोष्टी खटकतात, मग ते पत्नीसह असो, आईसह असो… आपण ते स्वीकारायला तयार नसतो. वरवर पाहता ते प्रश्न म्हणून वाटतही नाहीत. ते खूप छोटे प्रश्न वाटत असल्यानं आपण त्याविषयी संवाद साधायला सुरुवात नाही केली. नेमकं काय चुकतंय, आपण एकमेकांपासून इतके का दुरावलोय,सोशल मीडियाद्वारे आपण ग्लोबल प्लॅटफॉर्मवर जवळ आलोय, पण प्रत्यक्षात एकमेकांशी बोलत नाही, संवाद साधत नाही. या सगळ्याविषयी मालिकेत आपण बोलणार आहोत. मात्र हे करताना कुठेही ज्ञानाचा डोस देण्याचा प्रयत्न आम्ही करणार नाही. अभिनेता म्हणूनही या विषयी माझ्या मनात असलेली खदखद या कार्यक्रमातून मोकळी करणार आहे. 

या मालिकेद्वारे तू छोट्या पडद्यावर पदार्पण करतोयस. नेमका काय विचार केलास ही मालिका स्वीकारताना?

 सर्वांत महत्त्वाचं, मला प्रेक्षकांशी थेट संवाद साधण्याची ही उत्तम संधी आहे. माझा देश, माझ्या महाराष्ट्रात जे काही घडतंय, त्याविषयी बोलायचं होतं, मांडायचं होतं. माझे आजोबा एका मोठ्या वृत्तपत्राचे संपादक होते. ते त्यांच्या लेखांतून, अग्रलेखांतून समाजातील चुकीच्या गोष्टी दाखवायचे, समाजाच्या भल्याचा विचार करायचे. मलाही कुठेतरी, कधीतरी तसं करायचं होतं. प्रेमा तुझा रंग कसा ही मालिका त्यासाठी सर्वोत्तम संधी होती. या माध्यमाचा पुरेपूर वापर मी संवाद साधण्यासाठी करणार आहे. 

या मालिकेच्या निमित्ताने स्टार प्रवाहशी तू जोडला गेलायस. त्याविषयी काय वाटतं?

खूपच छान वाटतंय. कारण, तुम्ही माझी आजवरची वाटचाल पाहिलीत, तर लक्षात येईल की मी खूप कमी काम करतो. कारण, मला क्रिएटिव्ह फ्रिडम लागतं. प्रत्येक काम अपेक्षित परफेक्शननं झालं नाही की मला त्याचा त्रास होतो.  दिवसाचे पैसे मिळाले ना, चलता है यार अशा पद्धतीनं मी काम करूच शकत नाही. माझी काही ठाम मतं आहे. माझ्या विचारांशी साम्य असलेली मंडळी स्टार प्रवाहमध्ये आहेत. श्रावणी देवधर आणि सगळीच क्रिएटिव्ह टीम यांनी माझ्यावर जो काही विश्वास टाकलाय,मला क्रिएटिव्ह फ्रिडम दिलाय, त्यामुळे मला काम करायला खूपमजा येतेय. एखाद्या कलाकाराला आणखी काय हवं असतं? त्यामुळे मी खूप खुश आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!