
नागपूर : साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेल्या कोल्हापूर शहरातील श्री अंबाबाई मंदिर परिसर विकासासाठी श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर केला आहे. याकरिता गेले अनेक वर्षे अधिवेशनामध्ये विविध आयुधांद्वारे सभागृहाचे लक्ष वेधले. यानंतर शासनाने तीर्थक्षेत्र विकास आराखडा स्वतंत्र हेड निर्माण करीत रु. ३०० कोटींचा निधी मंजूर केला आहे. परंतु, आजतागायत तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचे काम रखडले आहे. श्री अंबाबाई मंदिर हे कोल्हापूरवासियांसह अखंड देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असून, श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचे काम जलदगतीने सुरु करा, अशी मागणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी नागपूर येथे सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात केली आहे. श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचे काम तातडीने सुरु व्हावे या मागणीसाठी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह इतर आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर निदर्शने करून शासनाचे लक्ष वेधले.
यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, श्री अंबाबाई मंदिर हे प्राचीन काळातील स्थापत्य शास्त्रातील उत्कुष्ट नमुना असून, नांदेड, पंढरपूर, तुळजापूर, शिर्डी देवस्थानच्या धर्तीवर श्री अंबाबाई मंदिराचा विकास व्हावा, या दृष्टीने गेले अनेक वर्षे शहरवासीय प्रयत्नशील आहेत. श्री अंबाबाई मंदिरात महिनाकाठी लाखो भाविक भेट देत असतात. परंतु, श्री अंबाबाई मंदिरात भक्तीनिवास, पार्किंग अशा अनेक मुलभूत सोई सुविधांचा वाणवा असल्याने भाविकांचे अतोनात हाल होत आहेत. प्रशासनाने या तीर्थक्षेत्र आराखड्याचे सादरीकरण केले आहे. त्याचबरोबर शासनाकडून या आराखड्याचा पहिला टप्पा म्हणून रु.७६ कोटी मंजूर केले आहेत. पण, हा निधी आजतागायत कागदावरच असल्याने, श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकासाचे काम ठप्प आहे. या विकास आराखड्यातून मंदिर परिसराचा विकास व्हावा, पर्यायाने वाढणाऱ्या पर्यटनातून कोल्हापूर शहराचा विकास व्हावा, अशी प्रत्तेक कोल्हापूरवासीयांची भावना आहे. निधी मंजुरीनंतर आराखड्याच्या प्रत्यक्ष कामाकडे करवीर वासियांचे लक्ष लागले असून, श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचे काम जलदगतीने सुरु करावे, अशी मागणीही आमदार राजेश क्षीरसागर यांनी यावेळी केली.
यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, आमदार मंगेश कुडाळकर, आमदार अजय चौधरी, आमदार प्रकाश गजभिसे यांच्या सह आदी विधानसभा सदस्य उपस्थित होते.
Leave a Reply