
12लोकराजा राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांना केंद्र सरकारने भारत रत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करावे, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी आज लोकसभेत केली. नियम ३७७ अंतर्गत लोकसभेत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करताना, खासदार महाडिक यांनी, राजर्षी शाहू महाराजांना भारत रत्न पुरस्कार देण्याची मागणी करून, कोल्हापूर वासीयांसह तमाम शाहूंप्रेमींच्या भावनेला वाचा फोडली. खासदार महाडिक यांच्या या मागणीला शाहूप्रेमी जनतेचा मोठा पाठिंबा व्यक्त होत आहे.
सध्या नवी दिल्लीत संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आज नियम ३७७ नुसार लोकसभेतील चर्चेत सहभागी होत, कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला. समतेचे पुरस्कर्ते आणि दिनदलितांचे कैवारी असलेल्या राजर्षि शाहू महाराज यांना, केन्द्र सरकारने भारत रत्न पुरस्कार जाहीर करावा, अशी मागणी खासदार महाडिक यांनी केली. सन १८७४ मध्ये जन्मलेल्या शाहू महाराजांनी सामाजिक समतेचा पाया रचला. १८९४ मध्ये महाराजांनी गुलामगिरी प्रथा मोडीत काढली. सर्व जाती धर्मातील मुलामुलींना शिक्षण मिळावे, यासाठी महाराजांनी कोल्हापुरात ११ बोर्डिंग सुरू केली. कोल्हापूरला रेल्वे आली, ही केवळ शाहू महाराजांच्या प्रयत्नामुळे ! त्याकाळी राजर्षि शाहू महाराजांनी मागासवर्गीयांसाठी सरकारी नोकरीत आरक्षण सुरू केले. विधवा पुनर्विवाहाला कायदेशीर मान्यता दिली. देवदासी प्रथा रोखण्यासाठी कठोर कायदा बनवला. राधानगरी धरण बांधून पाण्याचा प्रश्न सोडवला. कोल्हापुरात गुळाची बाजारपेठ उभारली. अनेक कलाकार, खेळाडूंना राजाश्रय दिला. शेती, उद्योग, सहकार क्षेत्राला चालना दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या मूकनायक या वृत्तपत्रासाठी, शाहू महाराजांनी मदत केली. अस्पृश्यता निवारणासाठी महाराजांनी कृतीशील आदर्श घालून दिला. कोल्हापूरसह संपूर्ण देशाला शाहू महाराजांनी प्रगतीचा, समतेचा विचार दिला. अशा या दूरदृष्टीच्या लोकराजाला केंद्र सरकारने भारत रत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी करून, खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूरचा आवाज दिल्लीत बुलंद केला आहे. कोल्हापूरची शान आणि वैभव असलेल्या, राजर्षि शाहूंना भारत रत्न पुरस्कार मिळावा, यासाठी तमाम शाहूप्रेमी जनतेचा खासदार महाडीक यांना पाठिंबा मिळत आहे.
Leave a Reply