
कोल्हापूर: महावितरणच्या प्रस्तावित 22 टक्के वीज दरवाढीच्या विरोधात राज्यातील सर्व जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने महावितरणच्या स्थानिक विभागीय अथवा जिल्हा कार्यालयावर प्रचंड संख्येने मोर्चे आयोजित केले जातील व त्या ठिकाणी वीज दरवाढ प्रस्तावाची होळी करण्यात येईल तसेच तेथील ससंबंधीत अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येइल. राज्यातील किमान 25 जिल्ह्यातील पन्नास ठिकाणी हे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाची सुरुवात म्हणून सोमवारी 30 जुलै रोजी दुपारी बारा वाजता कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे या ठिकाणी सर्वपक्षीयांच्या वतीने वीज वितरण मुख्य कार्यालयाच्या दारात प्राध्यापक डॉ. एन डी पाटील, वीज तज्ञ प्रताप होगाडे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, कोल्हापूर शहराच्या महापौर शोभा बोंद्रे या नेतेमंडळींच्या प्रमुख उपस्थितीत महावितरणच्या प्रस्तावित वीज दरवाढ पत्रकाची होळी करण्याचे आयोजन केले आहे. या होळी आंदोलनात सहकारी पाणीपुरवठा संस्था, सभासद संस्था पदाधिकारी, खाजगी कृषीपंपधारक, शेतकरी औद्योगिक वीज ग्राहक लघुउद्योग, उद्योजक वीजग्राहक तसेच ग्रामीण व शहरी भागातील घरगुती वीज ग्राहक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी पत्रकार बैठकीत केले. तसेच प्रत्येक जिल्ह्यातून किमान दहा हजार याप्रमाणे 25 लाख हून अधिक हरकती आयोगासमोर दाखल करण्यात येणार आहेत. फक्त आठ पैसे वाढ अशी जाहिरात करून सर्वसामान्य घरगुती वीज ग्राहकांची फसवणूक व दिशाभूल करणारे प्रसिद्धीपत्रक काढायचे कोडगेपणा केवळ महावितरण कंपनीत करू शकते. महावितरण कंपनीचा हा प्रस्ताव राज्याच्या कृषी औद्योगिक व सामाजिक विकासाच्या दृष्टीने अत्यंत घातक व विनाशक आहे. शेतीपंपाची वीज बिले दुप्पट करून पंधरा टक्के वितरण गळती लपवली जात आहे व दरवर्षी नऊ हजार कोटी रुपयांच्या चोरीला व भ्रष्टाचाराला संरक्षण दिले जात आहे. या अतिरिक्त गळतीची व भ्रष्टाचाराची रक्कम 90 पैसे प्रतियुनिट याप्रमाणे प्रामाणिक वीजग्राहकांवर लागली जात आहे. याचा सर्वाधिक फटका शेती पंप वीज ग्राहकांना बसणार आहे. याबाबतीत महावितरण व राज्य सरकारला जाग आणण्यासाठी व निर्णय घेण्यास भाग पाडण्यासाठी हे आंदोलन राज्यभर तीव्र करण्यात येईल असे पत्रकार बैठकीत जाहीर करण्यात आले. यावेळी बाबासाहेब पाटील-भुयेकर, विक्रांत पाटील- किणीकर, चंद्रकांत पाटील, आर.के पाटील उपस्थित होते.
Leave a Reply