
नवी दिल्लीत सध्या सुरू असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आज पुन्हा एकदा खासदार धनंजय महाडिक यांनी, कोल्हापूरच्या अनियमित विमान सेवेबद्दल प्रश्न उपस्थित केला. एअर डेक्कन कंपनीने कोणतेही सबळ कारण न देता, अचानक कोल्हापूर – मुंबई विमान सेवा बंद केली. त्यामुळे पर्यटक, उद्योजक यांची कुचंबणा झाली. व्यावसायिक नितीमुल्यांचे पालन न करणार्या एअर डेक्कन कंपनीला ब्लॅकलिस्ट मध्ये टाकावे आणि स्पाईस जेट किंवा इंडिगो यासारख्या विमान कंपनीला कोल्हापूर – मुंबई सेवा देण्यास अनुमती द्यावी, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी केली. त्यामुळे कोल्हापूरची विमान सेवा नियमित होण्याच्या दृष्टीने खासदार महाडिक पाठपुरावा करत असल्याचे स्पष्ट झाले.
लोकसभेच्या शून्य प्रहरात बोलताना आज खासदार धनंजय महाडिक यांनी, पुन्हा एकदा कोल्हापूरच्या विमान सेवेचा प्रश्न उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, लहान शहरांना मोठ्या शहरांशी जोडण्यासाठी सन २०१५ मध्ये उडाण योजना आखली. त्यामध्ये कोल्हापूरचा समावेश झाल्याने, ६ वर्षे खंडित असलेली विमान सेवा सुरू झाली आणि १७ एप्रिल २०१८ ला एअर डेक्कन कंपनीकडून कोल्हापूर – मुंबई – कोल्हापूर या मार्गावर विमान उड्डाण होवू लागले. पहिले दोन महिने ही विमान सेवा नियमित आणि वेळेवर सुरू होती. जवळपास ९० टक्के बुकींग आणि पुढील तीन महिन्याचे आरक्षण होत असल्याने, ग्राहकांचा प्रतिसादही उत्तम असायचा. तरीही एअर डेक्कन कंपनीने कोणतेही संयुक्तीक कारण न देता, अचानक कोल्हापूर – मुंबई विमान सेवा बंद केली. त्यामुळे पर्यटक, भाविक, उद्योजक यांची कुचंबणा झाली. बेभरवशाची आणि अनियमित विमान सेवा देणार्या एअर डेक्कन कंपनीला ब्लॅकलिस्ट मध्ये टाकावे आणि इंडिगो, स्पाईस जेट किंवा एअर एशिया या कंपन्यांना कोल्हापूरच्या विमान तळावरून हवाई वाहतुक सेवा सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी खासदार महाडिक यांनी केली. कोल्हापूरची विमान सेवा नियमित आणि सुरळीतपणे कायमस्वरूपी रहावी, यासाठी खासदार धनंजय महाडिक पाठपुरावा करत असल्याचे आज पुन्हा एकदा दिसून आले.
Leave a Reply