
कोल्हापूर : यावर्षी गणेशोत्सवास दि. १३ सप्टेंबर २०१८ रोजी पासून सुरवात होत असून, संपूर्ण महाराष्ट्रात श्री गणेश आगमना सह गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या नियमाआधीन राहून साऊंड सिस्टम लावण्यास प्रशासन परवानगी देत असताना कोल्हापुरात मात्र प्रशासनाने कोणालाही विचारात न घेता मंडळांवर गेल्यावर्षी दडपशाहीची भूमिका घेतली. सर्वोच्च न्यायालयाच्या नियमा आधीन राहून गणेशोत्सव काळात साउंड सिस्टीम लावण्यास परवानगी द्यावी, अशी रास्त मागणी कोल्हापुरातील मंडळांची असून, या मंडळांवर प्रशासनाने दडपशाही करू नये, त्यांचे प्रबोधन करावे, असे प्रतिपादन आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले आहे. शिवसेना शहर कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, शनिवार पेठ येथील शिवगिरी समाज विकास मंडळ यांच्यावतीने गणेशोत्सव २०१८ या काळात मे. सर्वोच्च न्यायालयाच्या नियमा आधीन राहून साउंड सिस्टम लावण्यास परवानगी मिळावी याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने शिवगिरी समाज विकास मंडळाच्या वतीने दाखल केलेल्या या याचिकेवर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने ध्वनी प्रदुषणासंबधी पारित केलेल्या नियमांच्या आधीन राहून साउंड सिस्टमला परवानगी द्यावी, याबाबत येत्या पाच दिवसात योग्य तो निर्णय घ्यावा, असे आदेश कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख यांना दिले आहेत.
कोल्हापूर गणेशोत्सवास सव्वाशे वर्षांची परंपरा लाभली आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर सारखा मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव इतर कोठेही एवढ्या जल्लोषात व शांततेत साजरा केला जात नाही. गणेशोत्सव काळातच पोलीस प्रशासन साउंड सिस्टम विरोधी मोहीम हाती घेते आणि साउंड सिस्टम व्यावसायिकांसह मंडळांवर दबावतंत्राचा वापर करून साउंड सिस्टम विरोधात सक्ती केली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार इतर मुंबई शहरामध्ये गणेशोत्सवाच्या पाचव्या, सातव्या आणि शेवटच्या दिवशी सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत साउंड सिस्टमला परवानगी दिली जाते. यासह कोल्हापूर शेजारील सांगली, सातारा, कराड, मिरज आदी शहरांमध्येही पोलीस प्रशासनाने सहकार्याची भूमिका घेऊन मंडळांना साउंड सिस्टम लावन्यास परवानगी देतात, असे असताना कोल्हापूर शहरातच मंडळावर आणि साउंड सिस्टम व्यावसायीकांवर दंडुकशाहीचा वापर करून परवानगी नाकारण्यात येत आहे. मे.सर्वोच्च न्यायालयाच्या नियमा आधीन राहून कोल्हापूरातही साऊंड सिस्टमला परवानगी द्यावी हि कोल्हापुरातील बहुतांश मंडळांची मागणी रास्तच आहे.
कोल्हापूर शहरात आज सुमारे ४००० साउंड सिस्टम व्यावसायिक आहेत. एका साउंड सिस्टम मागे दहा कुटुंब म्हणजेच पन्नास लोक अवलंबून आहेत. याच व्यवसायाशी निगडीत लाईट, जनरेटर, ट्रक्टर आदींची संख्या हजाराच्या पटीत आहे. एकीकडे वाढत्या बेरोजगारीने युवक हवालदिल झाले असताना, त्यांनी उभ्या केलेल्या व्यवसायावर प्रशासन बंदी आणून त्यांचे रोजगार नष्ट करण्याचा प्रयत्न करणे अत्यंत चुकीचे आहे. आजच्या युवा पिढीला साउंड सिस्टम चे आकर्षण आहे, त्यामुळे त्यांच्या आनंदावर कोणीही विरजन घालण्याचा प्रयत्न कोनीही करू नये. साउंड सिस्टमचा विचार न करता त्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबाचा विचार करून साउंड सिस्टमला परवानगी द्यावी, अशी मागणी करीत आपण जनते सोबत राहणार असून पोलीस प्रशासनानेही सहकार्याची भूमिका घेऊन राजारामपुरी येथील गणेशोत्सव आगमण मिरवणूक आणि मुख्य गणेशोत्सव विसर्जन मिरवणुक सुरळीत पार पाडण्याकरिता सकारात्मक भूमिका घ्यावी, अशाही मागणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली आहे.
Leave a Reply